New Zealand vs South Africa, Champions Trophy Semi Final : न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफीची दुसरी सेमी फायनल लाहोरमध्ये झाली. या सामन्यात न्यूझीलंडनं दक्षिण आफ्रिकेचा 50 रन्सनं पराभव केला. या विजयासह न्यूझीलंडनं स्पर्धेची फायनल गाठली आहे. आता फायनलमध्ये त्यांची लढत भारताविरुद्ध रविवारी (9 मार्च ) होईल. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील फायनल दुबईमध्ये खेळवली जाईल.
लाहोरमध्ये झालेल्या दुसऱ्या सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडची कॅप्टन मिचेल सँटनरनं टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय न्यूझीलंडच्या बॅटर्सनी योग्य ठरवला. न्यूझीलंडनं निर्धारित 50 ओव्हर्समध्ये 6 आऊट 362 रन्सचा विशाल स्कोअर उभा केला. दक्षिण आफ्रिकेला हे आव्हान पेलवलं नाही. त्यांनी निर्धारित 50 ओव्हर्समध्ये 9 आऊट 312 रन्स केले. आफ्रिकेकडून डेव्हिड मिलरनं 67 बॉल्समध्ये नाबाद 100 रन्सची आक्रमक खेळी केली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
न्यूझीलंडकडून राचिन रविंद्रनं 108 रन्स केले. त्यानं 101 बॉल्समध्ये 13 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीने हे रन केले. रविंद्रप्रमाणेच अनुभवी केन विल्यमसननं देखील सेंच्युरी झळकावली. विल्यमसननं 102 रन्स काढले. डॅरेल मिचेल आणि ग्लेन फिलिप्स यांनी प्रत्येकी 49 रन्स करत न्यूझीलंडला विशाल स्कोअर उभा करुन दिला.
या स्पर्धेत एकदाही पराभूत न झालेल्या दक्षिण आफ्रिकेला न्यूझीलंडनं दिलेलं 363 रन्सचं आव्हान पेलवलं नाही. दक्षिण आफ्रिकेकडून कॅप्टन टेंबा बावुमानं 56 रन काढले. तर रासी व्हेन डेर डुसेननं 69 रन्सची खेळी केली. डेव्हिड मिलरनंही शेवटच्या ओव्हर्समध्ये प्रतिकार केला. पण, त्यांचे हे प्रयत्न अपुरे ठरले.
( नक्की वाचा : Gautam Gambhir : रोहित शर्मावर प्रश्न विचारणाऱ्या पाकिस्तानी पत्रकाराची गंभीरनं केली बोलती बंद )
25 वर्षांनी भारत - न्यूझीलंड आमने -सामने
ICC वन-डे स्पर्धेच्या फायनलमध्ये तब्बल 25 वर्षांनी भारत आणि न्यूझीलंड या दोन टीम समोरासमोर येणार आहेत. यापूर्वी आयसीसी मिनी वर्ल्ड कप (चॅम्पिन्स ट्रॉफीचं पूर्वीचं नाव) स्पर्धेत 2000 साली या दोन टीम आमने-सामने उभ्या टाकल्या होत्या.
केनियामध्ये झालेल्या त्या स्पर्धेच्या फायनलमध्ये न्यूझीलंडनं टीम इंडियाचा 4 विकेट्सनं पराभव केला होता. आता या पराभवाचा बदला घेण्याची संधी टीम इंडियाला 25 वर्षांनी मिळाली आहे.