Rohit Sharma: हिटमॅनचं वादळी कमबॅक! स्फोटक शतकासह रचला इतिहास; ख्रिस गेलचा विक्रम मोडला

रोहितने अवघ्या 76 चेंडूंमध्ये धुवाँधार खेळी करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 338 दिवसांनी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये 475 दिवसांनी शतक ठोकले.

जाहिरात
Read Time: 2 mins

Ind Vs ENG ODI: भारत आणि इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना आज कटकमध्ये खेळवला जात आहे. इंग्लंडच्या 305 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या टीम इंडियाने दमदार सुरुवात केली असून कर्णधार रोहित शर्माने वादळी शतक झळकावले आहे. रोहितने अवघ्या 76 चेंडूंमध्ये धुवाँधार खेळी करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 338 दिवसांनी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये 475 दिवसांनी शतक ठोकले.

भारत आणि इंग्लंडमध्ये दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना सुरु आहे. इंग्लंडने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतासमोर विजयासाठी 305 धावांचे लक्ष्य ठेवले. त्यानंतर मैदानात उतरलेल्या टीम इंडियाच्या सलामविरांनी जोरदार सुरुवात केली. या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा जुन्या फॉर्ममध्ये आल्याचे पाहायला मिळाले. रोहितने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात  तुफानी शतक झळकावले. या खेळीमध्ये त्याने 7 षटकार आणि 9 चौकार मारले. 

रोहितने फलंदाजीला येताच चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करायला सुरुवात केली. त्याने  फक्त 30 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. या वादळी खेळीसोबतच रोहित शर्माने  एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज ख्रिस गेलला मागे टाकले. गेलने 294 डावांमध्ये 331 षटकार मारले. रोहितने फक्त 259 डावांमध्ये हा विक्रम पार केला आणि दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला. आता त्याच्या पुढे फक्त पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी (351) आहे.

तत्पुर्वी, सामन्यात प्रथम फलंदाजी केलेल्या इंग्लंडचा डाव 304 धावांवर आटोपला. इंग्लंडकडून बेन डकेट आणि जो रूट यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. दोघांनीही अर्धशतके ठोकली. डकेट 65 धावा करून बाद झाला, तर रूट 69 धावा करून बाद झाला. जोस बटलरने 34 धावांचे योगदान दिले. हॅरी ब्रुक 31 धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. 

Advertisement