Jasprit Bumrah : भारत आणि इंग्लंड यांच्यातील सध्या सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पाचवा आणि अखेरचा सामना 31 जुलै ते 4 ऑगस्ट 2025 दरम्यान केनिंगटन ओव्हल येथे खेळवला जाणार आहे. या महत्त्वपूर्ण आणि निर्णायक सामन्यापूर्वी एक मोठी बातमी समोर येत आहे. भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह ओव्हल कसोटीत खेळणार नाही. विशेष म्हणजे, यामागे दुखापत हे कारण नाही.
बुमराहला ओव्हल कसोटीतून वगळण्याचा निर्णय बीसीसीआयने मेडिकल टीमच्या सल्ल्यानुसार घेतला आहे. मेडिकल टीम आणि टीम मॅनेजमेंटसोबत झालेल्या चर्चेनंतर बीसीसीआयने स्पष्ट केले आहे की, हा निर्णय बुमराहच्या पाठीच्या दुखापतीची सावधगिरी आणि त्याच्या दीर्घकाळच्या कारकिर्दीचा विचार करून घेण्यात आला आहे. बुमराहसारख्या महत्त्वाच्या खेळाडूच्या फिटनेसला प्राधान्य देत, भविष्यातील मालिकांसाठी त्याला तंदुरुस्त ठेवण्याचा हा एक प्रयत्न आहे.
(नक्की वाचा- Gautam Gambhir: टीम इंडियाच्या सरावावेळी हेड कोच गंभीर संतापला, ओव्हल मैदानावर जोरदार राडा, पाहा Video)
इंग्लंड दौऱ्यावर येण्यापूर्वीच संघ व्यवस्थापनाने बुमराहच्या समावेशाबाबत आपला इरादा स्पष्ट केला होता. बीसीसीआय आपल्या स्टार वेगवान गोलंदाजाच्या कारकिर्दीशी कोणतीही तडजोड करू इच्छित नाही. त्यामुळेच, त्याच्या वर्कलोडला लक्षात घेऊन, पाच सामन्यांच्या या मालिकेत तो केवळ तीन सामन्यांमध्येच खेळताना दिसेल, असे संकेत आधीच देण्यात आले होते. हा निर्णय खेळाडूच्या आरोग्यासाठी महत्त्वाचा मानला जात आहे.
( नक्की वाचा : IND vs ENG : हॅरी ब्रुकला बॉलिंग देण्याचा रडीचा डाव का खेळला? बेन स्टोक्सनं सांगितलं कारण )
आकाशदीपला मिळू शकते संधी
अंतिम कसोटी सामन्यापूर्वी वेगवान गोलंदाज आकाशदीप आणि अर्शदीप सिंह पूर्णपणे फिट झाले आहेत. बुमराहच्या अनुपस्थितीमुळे, अखेरच्या कसोटी सामन्यात त्याच्या जागी आकाशदीपला पदार्पण करण्याची संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच, चौथ्या कसोटीत फारसा प्रभावी न ठरलेल्या अंशुल कंबोजच्या जागी अर्शदीप सिंहलाही पदार्पणाची संधी मिळू शकते, अशीही चर्चा आहे. भारतीय संघ व्यवस्थापनासमोर आता बुमराहच्या जागी कोणत्या वेगवान गोलंदाजाला संधी द्यायची, हे आव्हान आहे.