IND vs ENG,T20 World Cup 2026: भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर टी20 वर्ल्ड कपची सेमी फायनल सुरु आहे. टीम इंडियाचा हेड कोच गौतम गंभीरसाठी ही मॅच अत्यंत महत्त्वाची आहे. यावेळी वानखेडे स्टेडियमवर उतरण्यापूर्वी गंभीरनं जे काही केलं, ते पाहून प्रत्येक क्रिकेट फॅनच्या अंगावर काटा आला असेल.
मैदानात पाऊल ठेवण्यापूर्वी गंभीरने काय केलं?
भारत आणि इंग्लंड यांच्यातील हा सेमी फायनलचा सामना सुरू होण्यापूर्वी हेड कोच गौतम गंभीर जेव्हा मैदानात येत होता, तेव्हा कॅमेरे पूर्णपणे त्याच्यावरच रोखलेले होते. बाउंड्री लाईनच्या आत पाऊल ठेवण्यापूर्वी तो अचानक थांबला आणि काहीतरी पुटपुटताना दिसला. जणू काही तो विजयासाठी देवाचा आशीर्वाद मागत होता किंवा एखादा मंत्र म्हणत होता. हे दृश्य इतकं खास होतं की कोणाचंही लक्ष तिथून हललं नाही. बाउंड्री ओलांडताना त्याने शांतपणे प्रार्थना केली आणि मगच मैदानात एन्ट्री घेतली.
आकाशाकडे पाहत विजयाचा निर्धार
मैदानात पाऊल ठेवल्यानंतरही गंभीरचं वागणं सर्वांना थक्क करणारं होतं. तो समोर न पाहता काही वेळ आकाशाकडे पाहत उभा होता. जणू काही तो निसर्गाशी किंवा नशिबाशी संवाद साधत होता. काही सेकंद आकाशाकडे एकटक पाहिल्यानंतर तो पुढे गेला आणि त्याने भारतीय खेळाडूंची भेट घेतली. गंभीरचा हा आत्मविश्वास आणि त्याची ही पद्धत पाहून असं वाटतंय की त्याने इंग्लंडला धूळ चारण्यासाठी नक्कीच काहीतरी मोठी योजना आखली असणार.
( नक्की वाचा : Sanju Samson: 'तो' एक निर्णय आणि संजू सॅमसनचे नशीब पालटले, वाचा वादळी पुनरागमनाची सिक्रेट स्टोरी! )
टी20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाची दमदार वाटचाल
गौतम गंभीर जेव्हापासून भारतीय टीमचा हेड कोच बनलाय, तेव्हापासून टीम इंडियाने टी20 फॉरमॅटमध्ये आपली ताकद दाखवून दिली आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली सध्याच्या टूर्नामेंटमध्ये टीम इंडियाने आतापर्यंत एकही कसर सोडलेली नाही. आज जर भारतीय संघाने इंग्लंडला हरवलं, तर 8 मार्च रोजी न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडिया फायनल मॅच खेळेल. गंभीरची शिस्त आणि खेळाडूंचा जोश पाहता, यावेळी वर्ल्ड कप आपल्याकडेच येणार असं चित्र दिसतंय.