IND vs SA 2nd Test: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये शनिवारी एक असा क्षण पाहायला मिळाला, जो टेस्ट क्रिकेटच्या 148 वर्षांच्या इतिहासात कधीही घडला नव्हता. गुवाहाटीच्या बरसापारा स्टेडियममध्ये सुरू असलेल्या या मॅचच्या पहिल्याच दिवशी लंच ब्रेकच्या आधी टी-ब्रेक घेण्यात आला!
का झाला बदल?
ईशान्य भारतात सूर्योदय लवकर होतो आणि सूर्यास्तही लवकर होतो, या भौगोलिक कारणामुळे हा मोठा बदल करण्यात आला. नैसर्गिक प्रकाशाच्या उपलब्धतेमुळे मॅचचा वेळ बदलण्यात आला.
या नवीन वेळेनुसार, मॅचचे पहिले सत्र सकाळी 9 वाजता सुरू झाले आणि ते 11 वाजेपर्यंत चालले. त्यानंतर, नेहमीप्रमाणे लंच न घेता, सकाळी 11:00 ते 11:20 पर्यंत टी-ब्रेक घेण्यात आला. या अनोख्या ब्रेकमुळे बरसापारा क्रिकेट स्टेडियम भारतीय क्रिकेटच्या इतिहासात नोंदवलं गेलं, कारण या मैदानावर खेळवली जाणारी ही पहिली टेस्ट मॅच ठरली.
दक्षिण आफ्रिकेची दमदार सुरुवात
टॉस जिंकून दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन टेम्बा बावुमा याने पहिले बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेच्या ओपनिंग जोडीने भारतीय बॉलर्सना चांगली झुंज दिली. एडेन मार्करम आणि रयान रिकेल्टन या ओपनिंग बॅटर्सनी दमदार सुरुवात करत 82 रनची मजबूत पार्टनरशिप केली. टी-ब्रेकच्या वेळी दक्षिण आफ्रिकेचा स्कोर 1 आऊट 82 असा होता. ज्यात रिकेल्टन 35 रनवर नॉट आऊट होता.
( नक्की वाचा : BANA vs INDA : 'त्या' चुकीनं सारं संपलं... सुपर ओव्हरमधील 'सुपर मिस्टेक' मुळे भारतीय टीम बांगलादेशकडून पराभूत )
मॅचच्या सुरुवातीला जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज या दोघांनी एकदम अचूक लाइन-लेन्थवर बॉलिंग केली. मार्करम याला पहिल्या 10 ओव्हर्समध्ये फक्त दोन बाउंड्री मारता आल्या. त्यामुळे सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेचा स्कोर 26/0 असा संथ होता. रिकेल्टन याने सिराजवर सलग दोन चौकार मारून रन-गती वाढवली आणि आफ्रिकन टीम पहिल्या तासात 34 रनपर्यंत पोहोचली.
ड्रिंक्स ब्रेकनंतर मात्र रन अधिक वेगाने आले. रिकेल्टन याने नितीश रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्यावर बाउंड्री मारल्या, तर मार्करम यानेही नितीशवर दोन चौकार मारत टीमचा स्कोर 70 रनच्या पुढे नेला. दक्षिण आफ्रिकेच्या बॅटर्सनी पार्ट्नरशिप तोडण्यासाठी संघर्ष करणाऱ्या भारतीय बॉलर्सना चांगलंच थकवलं.
बुमराहने उखडला स्टंप
26.5 ओव्हरमध्ये, बुमराहने जबरदस्त बॉलिंग करत मार्करम याचा मिडल स्टंप उखडून टाकला. मार्करम 38 रनवर आऊट झाला आणि भारताला पहिली मोठी सफलता मिळाली. मार्करम आऊट होताच दक्षिण आफ्रिकेचा स्कोर 82/1 झाला आणि याच स्कोरवर टी-ब्रेक घेण्यात आला.
भारतासाठी ही मॅच खूप महत्त्वाची
टीम इंडिया या सीरीजमध्ये आधीच 0-1 ने पिछाडीवर आहे. त्यामुळे लागोपाठ दुसऱ्या वर्षी टेस्ट सीरीज हारण्यापासून वाचण्यासाठी भारतासाठी ही मॅच खूप महत्त्वाची आहे. गेल्या वर्षी न्यूझीलंडने पहिल्यांदाच भारतात टेस्ट सीरीजमध्ये व्हाईटवॉश दिला होता. SENA (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया) देशांविरुद्ध भारत आपल्याच घरात सलग चार टेस्ट मॅच हारलेला आहे.
दोन्ही टीमचे प्लेइंग XI
भारत (India): केएल राहुल, यशस्वी जायसवाल, साई सुदर्शन, ध्रुव जुरेल, ऋषभ पंत (विकेटकीपर/कॅप्टन), रविंद्र जडेजा, नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज
दक्षिण आफ्रिका (South Africa): एडेन मार्करम, रयान रिकेल्टन, ट्रिस्टन स्टब्स, टेम्बा बावुमा (कॅप्टन) वियान मुल्डर, टोनी डी ज़ोरज़ी, काइल वेरेन (विकेटकीपर), मार्को जेनसेन, सेनुरन मुथुसामी, सायमन हार्मर आणि केशव महाराज
(हेडलाइन वगळता या बातमीमध्ये एनडीटीव्ही टीमने काहीही बदल केलेले नाहीत. ही सिंडीकेट फीडद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.)