वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स (WCL) 2025 च्या सेमीफायनलमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळायचे नाही, असा निर्णय इंडिया चॅम्पियन्स टीमनं घेतला आहे. NDTV ला सूत्रांनी ही माहिती दिली आहे. यापूर्वी, त्यांनी पाकिस्तानविरुद्धचा साखळी फेरीतील सामनाही टाळला होता, त्याच धोरणानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. युवराज सिंग, शिखर धवन, युसूफ पठाण, इरफान पठाण, पियुष चावला हे इंडिया चॅम्पियन्स संघाचे सदस्य आहेत. इंडिया चॅम्पियन्सने मंगळवारी वेस्ट इंडिज चॅम्पियन्सला अवघ्या 13.2 ओव्हर्समध्ये पराभव करत या स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला होता.
काय आहे कारण?
आशिया चषकाचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर बीसीसीआयला होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय आला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात 14 सप्टेंबर रोजी आशिया चषक स्पर्धेत सामना होणार आहे. दोन्ही संघ पुढील फेऱ्यांमध्ये पोहोचल्यास 21 आणि 28 सप्टेंबर रोजी पुन्हा आमनेसामने येण्याची शक्यता आहे. या वर्षी एप्रिलमध्ये झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंध बिघडले होते. आशिया चषक रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात होती, मात्र तसे काहीही झाले नाही.
यापूर्वी, भारतीय खेळाडू आणि प्रमुख टूर्नामेंट प्रायोजकाने तीव्र आक्षेप घेतल्यानंतर दोन्ही देशांमधील साखळी फेरीतील सामना अधिकृतपणे रद्द करण्यात आला होता. त्यानंतर, सुरेश रैना आणि शिखर धवन या माजी भारतीय क्रिकेटपटूंनी ते पाकिस्तानविरुद्ध खेळणार नसल्याचं जाहीर केलं होतं.
( नक्की वाचा : IND vs ENG : हॅरी ब्रुकला बॉलिंग देण्याचा रडीचा डाव का खेळला? बेन स्टोक्सनं सांगितलं कारण )
प्रायोजकाचीही माघार
बुधवारी, WCL च्या मुख्य प्रायोजकांपैकी एक असलेल्या EaseMyTrip ने भारत-पाकिस्तान WCL सेमीफायनलमधून माघार घेतली, पाकिस्तानशी संबंधित कोणत्याही सामन्यात सहभागी न होण्याच्या त्यांच्या दीर्घकाळापासूनच्या धोरणानुसार हा निर्णय घेण्यात आला होता.
"वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्समध्ये टीम इंडिया (India_Champions) च्या उत्कृष्ट कामगिरीचे आम्ही कौतुक करतो, तुम्ही देशाला अभिमान वाटेल असे काम केले आहे. पण, पाकिस्तानविरुद्धचा आगामी सेमीफायनल फक्त एक सामान्य सामना नाही, दहशतवाद आणि क्रिकेट एकत्र चालू शकत नाहीत. @EaseMyTrip, आम्ही भारतासोबत आहोत. दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या देशाशी संबंध सामान्य करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही कार्यक्रमाला आम्ही पाठिंबा देऊ शकत नाही. असं या कंपनीनं स्पष्ट केलं होतं.
( नक्की वाचा : IND vs ENG : ओव्हल टेस्टपूर्वी इंग्लंडला मोठा धक्का, बेन स्टोक्स बाहेर! हा खेळाडू करणार नेतृत्त्व )
"भारताच्या लोकांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे आणि आम्ही ती ऐकली आहे. EaseMyTrip WCL मधील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याशी संबंधित राहणार नाही. काही गोष्टी खेळापेक्षा मोठ्या असतात. राष्ट्र प्रथम, व्यवसाय नंतर, नेहमीच," असे EaseMyTrip चे सह-संस्थापक निशांत पिट्टी यांनी बुधवारी एका निवेदनात म्हटले आहे.