India vs Afghanistan, U19 World Cup 2026 Semi-Final: हरारेमध्ये रंगलेल्या अंडर 19 वर्ल्ड कपच्या दुसऱ्या सेमी फायनलमध्ये भारताने अफगाणिस्तानवर थरारक विजय मिळवून फायनलमध्ये धडक मारली आहे. अफगाणिस्तानने विजयासाठी दिलेले 311 रनचे डोंगराएवढे आव्हान भारताने अवघ्या 41.1 ओव्हरमध्ये पूर्ण केले.या विजयाचा खरा हिरो ठरला तो म्हणजे एरॉन जॉर्ज, ज्याने दमदार सेंच्युरी झळकावत अफगाणिस्तानच्या बॉलर्सची पार दैना उडवली.आता शुक्रवारी होणाऱ्या महामुकाबल्यात भारताची लढत इंग्लंडशी होणार आहे.
अरोन जॉर्जचे वादळी शतक
311 रनचा पाठलाग करताना भारताला एका भक्कम खेळीची गरज होती आणि ती जबाबदारी एरॉन जॉर्जने आपल्या खांद्यावर घेतली. त्याने अवघ्या 104 बॉलमध्ये 115 रनची तुफानी खेळी केली.या खेळीत त्याने अफगाण बॉलर्सना निष्प्रभ केला. तो 40 व्या ओव्हरमध्ये बाद झाला असला, तरी तोपर्यंत त्याने भारताचा विजय जवळपास निश्चित केला होता. या वर्ल्ड कपच्या इतिहासातील भारताचा हा एक रेकॉर्डब्रेक पाठलाग ठरला आहे.
वैभव सूर्यवंशीची तुफानी सुरुवात
टीम इंडियाच्या या मोठ्या विजयाचा पाया सलामीवीर वैभव सूर्यवंशीने रचला. त्याने मैदानात येताच अफगाणिस्तानच्या बॉलर्सवर हल्ला चढवला. वैभवने फक्त 33 बॉलमध्ये 68 रन कुटले, ज्यात 9 फोर आणि 4 सिक्सचा समावेश होता. त्याच्या या स्फोटक बॅटिंगमुळे भारताला हवी तशी दमदार सुरुवात मिळाली. कॅप्टन आयुष म्हात्रेने सुद्धा आपल्या बॅटची कमाल दाखवत 62 रनचे मोलाचे योगदान दिले, ज्यामुळे भारताला हा विजय मिळवणे सोपे झाले.