India vs Afghanistan, U19 World Cup 2026 Semi-Final: हरारेमध्ये रंगलेल्या अंडर 19 वर्ल्ड कपच्या दुसऱ्या सेमी फायनलमध्ये भारताने अफगाणिस्तानवर थरारक विजय मिळवून फायनलमध्ये धडक मारली आहे. अफगाणिस्तानने विजयासाठी दिलेले 311 रनचे डोंगराएवढे आव्हान भारताने अवघ्या 41.1 ओव्हरमध्ये पूर्ण केले.या विजयाचा खरा हिरो ठरला तो म्हणजे एरॉन जॉर्ज, ज्याने दमदार सेंच्युरी झळकावत अफगाणिस्तानच्या बॉलर्सची पार दैना उडवली.आता शुक्रवारी होणाऱ्या महामुकाबल्यात भारताची लढत इंग्लंडशी होणार आहे.
अरोन जॉर्जचे वादळी शतक
311 रनचा पाठलाग करताना भारताला एका भक्कम खेळीची गरज होती आणि ती जबाबदारी एरॉन जॉर्जने आपल्या खांद्यावर घेतली. त्याने अवघ्या 104 बॉलमध्ये 115 रनची तुफानी खेळी केली.या खेळीत त्याने अफगाण बॉलर्सना निष्प्रभ केला. तो 40 व्या ओव्हरमध्ये बाद झाला असला, तरी तोपर्यंत त्याने भारताचा विजय जवळपास निश्चित केला होता. या वर्ल्ड कपच्या इतिहासातील भारताचा हा एक रेकॉर्डब्रेक पाठलाग ठरला आहे.
Aaron George's match-winning century that led India to their tenth #U19WorldCup final gets him the @aramco Player of the Match 🌟 pic.twitter.com/4lgG319Xbc
— ICC (@ICC) February 4, 2026
वैभव सूर्यवंशीची तुफानी सुरुवात
टीम इंडियाच्या या मोठ्या विजयाचा पाया सलामीवीर वैभव सूर्यवंशीने रचला. त्याने मैदानात येताच अफगाणिस्तानच्या बॉलर्सवर हल्ला चढवला. वैभवने फक्त 33 बॉलमध्ये 68 रन कुटले, ज्यात 9 फोर आणि 4 सिक्सचा समावेश होता. त्याच्या या स्फोटक बॅटिंगमुळे भारताला हवी तशी दमदार सुरुवात मिळाली. कॅप्टन आयुष म्हात्रेने सुद्धा आपल्या बॅटची कमाल दाखवत 62 रनचे मोलाचे योगदान दिले, ज्यामुळे भारताला हा विजय मिळवणे सोपे झाले.
( नक्की वाचा : T20 World Cup 2026: फक्त भारतासोबत खेळणार नाही! पाकिस्तानच्या 'निवडक बहिष्कारा'वर काय सांगतात ICC चे नियम? )
अफगाणिस्तानची झुंजार बॅटिंग
याआधी टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करताना अफगाणिस्तानने 50 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून 310 रनचा डोंगर उभा केला होता. चालू टूर्नामेंटमध्ये पहिल्यांदाच एखाद्या टीमला भारताच्या बॉलिंग अटॅकसमोर 200 पेक्षा जास्त रन करता आले.
अफगाणिस्तानकडून उझैरउल्ला नियाझाई आणि फैसल शिनोझादा यांनी शानदार सेंच्युरी झळकावली. 17 वर्षांच्या फैसलने फक्त 86 बॉलमध्ये आपले शतक पूर्ण केले. या दोघांच्या शतकांमुळे अफगाणिस्तानला मोठी धावसंख्या उभारता आली होती, पण भारतीय बॅटर्सनी त्यांचा हा प्रयत्न फोल ठरवला.
( नक्की वाचा : Pakistan Cricket : पाकिस्तानचा 'गेम ओव्हर', भारताशी भिडण्याच्या नादात PCB जगात एकाकी, ICC चा महादणका तयार! )
कधी होणार फायनल?
सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला हरवून इंग्लंडने आधीच फायनलमध्ये आपले स्थान निश्चित केले होते. आता भारताने अफगाणिस्तानला 7 विकेट्सनी धूळ चारून फायनलचे तिकीट मिळवले आहे. त्यामुळे शुक्रवारी होणाऱ्या फायनलमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. भारताच्या या कामगिरीमुळे पुन्हा एकदा वर्ल्ड कप जिंकण्याची आशा उंचावली आहे.
टीम इंडियानं या विजयासह अंडर-19 वर्ल्ड कप सहाव्यांदा जिंकण्याच्या दिशेनं आणखी एक पाऊल टाकलं आहे. भारतानं ही स्पर्धा यापूर्वी पाचवेळा (2000, 2008, 2012, 2018, 2022) जिंकली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world