India's predicted Playing XI: भारत आणि इंग्लंड यांच्यातील सीरिजमधील दुसरी टेस्ट एजबेस्टनमध्ये बुधवारी (2 जुलै) रोजी खेळली जाईल. पहिल्या टेस्टमध्ये इंग्लंडने टीम इंडियाचा 5 विकेट्सनं पराभव केला. त्यामुळे इंग्लंड सध्या 1-0 नं आघाडीवर आहे. त्यामुळे भारतासाठी दुसरी टेस्ट अत्यंत महत्त्वाची आहे.
एजबेस्टनमध्ये टीम इंडियाला आत्तापर्यंत एकही टेस्ट जिंकता आलेली नाही. या मैदानावर टीम इंडियाने आतापर्यंत एकूण सात टेस्ट खेळल्या आहेत. पण, त्यानंतरही भारताची विजयाची पाटी कोरीच आहे. त्यापैकी तीन वेळा टीम इंडियाचा इनिंगनं पराभव झाला होता. त्यामुळे ही टेस्ट भारतासाठी आव्हानात्मक असणार आहे. त्यामुळे भारतीय टीममध्ये बदलाची शक्यता आहे.
बुमराह खेळणार नाही?
पहिल्या टेस्टमध्ये बुमराहनं 43 ओव्हर बॉलिंग केली होती. त्यानं पहिल्या इनिंगमध्ये 5 विकेट्स घेतल्या. पण, दुसऱ्या इनिंगमध्ये बुमराहाला एकही विकेट मिळाली नाही. पहिल्या इनिंगच्या तुलनेत तो दुसऱ्या इनिंगमध्ये अधिक थकलेला होता. त्याच्या बॉलिंगमध्येही ते दिसत होतं. त्यामुळे बुमराह दुसऱ्या टेस्टमध्ये खेळणार का? हा सर्वात मोठा प्रश्न आहे.
बुमराहवरील वर्कलोड लक्षात घेता तो 5 पैकी 3 टेस्ट खेलणार हे यापूर्वीच ठरलेलं आहे. त्यामुळे त्याला दुसऱ्या टेस्टमध्ये विश्रांती दिली जाईल, अशी शक्यता आहे.
( नक्की वाचा: IND vs ENG : पहिल्या टेस्टमधील पराभवानंतर टीम इंडियात बदल, 'या' खेळाडूची हकालपट्टी )
बुमराहच्या जागी कोण?
बुमराह खेळला नाही तर त्याच्या जागी कोणत्या गोलंदाजाला संधी मिळेल? हा प्रश्न आहे. त्याच्या जागेवर अर्शदीप सिंगचं नाव आघाडीवर आहे. अर्शदीपने नुकतीच काउंटी क्रिकेटमध्ये चांगली बॉलिंग केली होती. त्यामुळे बुमराहच्या जागी अर्शदीपला संधी मिळेल अशी अपेक्षा आहे.
शार्दुल ठाकूर बेंचवर बसणार?
पहिल्या टेस्टमध्ये कॅप्टन गिलनं शार्दुल ठाकूरचा जास्त वापर केला नाही. शार्दुल बॉलिंग आणि बॅटिंगमध्ये प्रभावी कामगिरी करु शकला नाही. टीम इंडियाकडं नितीश कुमार रेड्डीच्या रूपात शार्दुलला पर्याय उपलब्ध आहे. शार्दुलच्या जागी नितीशला टीममध्ये जागा मिळण्याची शक्यता आहे. नितीश बॅटिंगही चांगली करु शकतो. ऑस्ट्रेलिया सीरिजमध्ये त्यानं सेंच्युरीही झळकावली होती.
( नक्की वाचा : Vinod Kambli: 'विनोद कांबळीला कधीच पैशांची पर्वा नव्हती, त्यानं ती ऑफरही फेटाळली' माजी सहकाऱ्याचा गौप्यस्फोट )
कुलदीपला संधी मिळेल का?
कुलदीप यादवबाबत बरीच चर्चा सुरू आहे. अनेक दिग्गजांनी कुलदीपला संघात समाविष्ट करण्याची सूचना केली आहे. टीम इंडियाचा सहायक प्रशिक्षक रायन टेन डस्काटेनं हवामानानुसार प्लेईंग 11 ची निवड केली जाईल, असं सांगितलं होतं. त्यामुळे पिच स्पिन बॉलिंगला मदत करणारं असेल तर कुलदीपचा समावेश होऊ शकतो. पण, कुलदीपला स्पिन ऑलराऊंडर वॉशिंग्टन सुंदरशी स्पर्धा करावी लागेल. चांगली बॅटिंग ही वॉशिंग्टनची जमेची बाजू आहे.
कशी असेल टीम इंडियाची Playing XI
यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुभमन गिल (कॅप्टन), ऋषभ पंत (व्हाईस कॅप्टन/ विकेटकिपर), करुण नायर, रविंद्र जडेजा, नीतीश कुमार रेड्डी/शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव/वॉशिंग्टन सुंदर, प्रसिध कृष्णा, मोहम्मद सिराज