T20 World Cup 2024 Final: टी20 वर्ल्ड कप 2024 च्या फायनलमध्ये भारतानं दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत विजेतेपद पटकावलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह देशभरातली अनेक नेत्यांनी या ऐतिहासिक विजयाबद्दल भारतीय क्रिकेट टीमचं अभिनंदन केलं आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सांगितलं, 'T20 वर्ल्ड कप जिंकल्याबद्दल टीम इंडियाचं हार्दिक अभिनंदन. कधी हार न मानण्याच्या वृत्तीसह टीमनं अगदी कठीण परिस्थितीचा सामना केला. संपूर्ण स्पर्धेत सर्वोत्तम कौशल्याचं प्रदर्शनं केलं. फायनल मॅचमधील विजयही असाधारण आहे. शाबास टीम इंडिया. तुमचा आम्हाला अभिमान आहे.'
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडिया नेटवर्क X वर एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये पंतप्रधान म्हणतात, 'चॅम्पियन्स. आपली टीम जबरदस्त पद्धतीनं टी20 वर्ल्ड कप घेऊन आली आहे. आम्हाला भारतीय क्रिकेट टीमचा अभिमान आहे. पंतप्रधान पुढे म्हणाले, '140 कोटींपेक्षा जास्त भारतीयांना सर्व क्रिकेटपटूंच्या कामगिरीचा अभिमान आहे. देशातील प्रत्येक गावातील, गल्लीमधील भारतीयांचं मन त्यांनी जिंकलं आहे. भारतानं संपूर्ण स्पर्धेत एकही सामना गमावाला नाही. ही लहान उपलब्धी नाही. कारण, या स्पर्धेत अनेक टीम सहभागी झाल्या होत्या.'
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील टी20 विश्वकप जिंकणाऱ्या टीम इंडियाचं अभिनंदन केलं आहे. ग्रेट टीम इंडिया...आयसीसी टी२० क्रिकेट विश्वचषक २०२४ वर भारतीय संघाने उमटवली आपली मोहोर असं म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी भारतीय टीमचं कौतुक करणारी पोस्ट X वर केली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही 'सारे जहाँ से अच्छा हिन्दोस्ताँ हमारा' म्हणत भारतीय टीमचं अभिनंदन केलं आहे.
राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही भारतीय टीमच्या विजेतेपदाचा आनंद व्यक्त केलाय. 'आयसीसी टी-ट्वेंटी विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचे कौतुक करायला शब्द अपुरे आहेत. तब्बल सतरा वर्षांनंतर भारतीय क्रिकेट संघानं टी-ट्वेंटी वर्ल्डकप जिंकून देशवासियांना दिलेला आनंद अवर्णनीय आहे. संपूर्ण देश या विजयानं भारावून गेला आहे. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं केलेली कामगिरी जगज्जेत्यासारखीच आहे. भारतीय क्रिकेट संघाचं हे यश देशातील क्रिकेटसह देशातील अन्य खेळांना संजीवनी तसंच खेळाडूंना प्रेरणा देईल. आयसीसी टी-ट्वेंटी विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचं मी मनापासून अभिनंदन करतो.' असं अजित पवार यांनी म्हंटलं आहे.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी टीम इंडियाचा हा विजय जबरदस्त असल्याचं म्हंटलं आहे.'विश्व कप स्पर्धेतील जबरदस्त विजय आणि संपूर्ण स्पर्धेतील कामगिरीबद्दल टीम इंडियाचं अभिनंदन. सूर्या, काय जबरदस्त कॅच होता. रोहित, हा विजय तुझ्या नेतृत्त्वाचं प्रमाण आहे. राहुल, टीम इंडियाला तुझ्या मार्गदर्शनाची उणीव भासेल, हे मला माहिती आहे,'अशा भावना राहुल गांधी यांनी व्यक्त केल्या आहेत.