India vs Zimbabwe T20 World Cup 2026 : टी-20 विश्वचषक 2026 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दारुण पराभवानंतर भारतीय संघाने झिम्बाब्वेला नमवत दिमाखात पुनरागमन केले आहे. अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार आणि हार्दिक पंड्या यांच्या तुफानी फटकेबाजीच्या जोरावर भारताने या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या उभारली आणि उपांत्य फेरीच्या शर्यतीत स्वतःला कायम राखले आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवाचा वचपा काढत भारतीय संघाने झिम्बाब्वेवर 72 धावांनी मात करून सुपर-8 मध्ये जोरदार मुसंडी मारली आहे. झिम्बाब्वेने या आव्हानाचा पाठलाग करताना जिद्दीने झुंज दिली, पण त्यांना 184 धावांपर्यंतच मजल मारता आली.
अभिषेक आणि हार्दिकचे वादळ
या विजयाचे मुख्य शिल्पकार ठरले ते म्हणजे सलामीवीर अभिषेक शर्मा आणि अष्टपैलू हार्दिक पंड्या ठरले. अभिषेक शर्माने केवळ 30 चेंडूंत 4 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 55 धावा कुटल्या. तर हार्दिक पंड्याने अखेरच्या षटकांत झिम्बाब्वेच्या गोलंदाजांची पिसे काढली. त्याने अवघ्या 23 चेंडूंत नाबाद 50 धावा फटकावल्या.
(नक्की वाचा- Ind vs Zim T20 World Cup 2026: 'हार्दिक' अभिनंदन! टार्गेट गाठताना झिम्बाब्वेची दाणादाण, भारताचा ऐतिहासिक विजय)
- दक्षिण आफ्रिका (पात्र) - 2 सामने, 4 गुण, रन रेट +2.890
- वेस्ट इंडिज- 2 सामने, 2 गुण, रन रेट +1.791
- भारत- 2 सामने, 2 गुण, रन रेट -0.100
- झिम्बाब्वे- 2 सामने, 0 गुण, रन रेट -4.475
सेमीफायनलचे गणित
दक्षिण आफ्रिकेने आधीच उपांत्य फेरीत जागा निश्चित केली आहे. आता दुसऱ्या जागेसाठी भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात थेट लढत होईल.
समीकरण 1: जर भारताने रविवारी कोलकाता येथे वेस्ट इंडिजला कोणत्याही फरकाने हरवले, तर भारत थेट उपांत्य फेरीत प्रवेश करेल. जर वेस्ट इंडिजने भारताला हरवले, तर विंडीज पात्र ठरेल.
समीकरण 2: मात्र सामना पावसामुळे रद्द झाल्यास, चांगल्या रन-रेटमुळे वेस्ट इंडिजला फायदा होईल आणि भारत बाहेर पडेल.