भारत आणि पाकिस्तानमधील तणावाचा परिणाम इंडियन प्रीमियर लीगवर (IPL 2025) झाला आहे. आयपीएलचा सतरावा सिझन सध्या सुरु आहे. हा सिझन शेवटच्या टप्प्यात आलाय. टॉप 4 मधील स्थान नक्की करत प्ले ऑफ गाठण्यासाठी टीममध्ये स्पर्धा सुरु आहे. त्याचवेळी भारत आणि पाकिस्तानमधील तणावाचा फटका आयपीएलला बसला आहे. 11 मे रोजी होणाऱ्या मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्ज (Mumbai Indians vs Punjab Kings) मॅचचं ठिकाण बदलण्यात आलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नियोजित वेळापत्रकानुसार हा सामना हिमाचल प्रदेशातील धरमशालामध्ये होणार होता. पण, सुरक्षेच्या कारणामुळे तेथील विमानतळ बंद करण्यात आलंय. त्यामुळे हा सामना आता अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
गुजरात क्रिकेट असोसिएशनचे सचिव अनिल पटेल यांनी ही माहिती पीटीआयला दिली आहे. ही मॅच दुपारी खेळली जाणार आहे. बीसीसीआयनं याबाबत आम्हाला विनंती केली होती. ती विनंती आम्ही मान्य केली आहे. मुंबई इंडियन्सची टीम आज उशीरा इथं दाखल होईल. पंजाब किंग्जच्या आगमनाबाबत माहिती नंतर देण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं.
( नक्की वाचा : Operation Sindoor: भारताचा एअर स्ट्राईक पाहून PSL खेळत असलेल्या इंग्लंडच्या खेळाडू घाबरला! म्हणाला.. )
मुंबई इंडियन्सचे सध्या 12 मॅचनंतर 14 पॉईंट्स आहेत. तर पंजाब किंग्जचे 11 मॅचनंतर 15 पॉईंट्स आहेत. 'प्ले ऑफ' च्या शर्यतीमध्ये आपलं स्थान भक्कम करण्यासाठी दोन्ही टीम्सना रविवारी (11 मे) होणारी मॅच जिंकणे आवश्यक आहे.
रावळपिंडी स्टेडियमजवळ ड्रोन हल्ला
दरम्यान भारताच्या 15 लष्करी ठिकाणांवर हल्ला करण्याचा प्रयत्न पाकिस्ताननं केला होता. त्याला भारतानं चोख उत्तर दिलंय. भारतानं पाकिस्तानची हवाई सुरक्षा रडार यंत्रणा उद्धवस्त केली आहे. पाकिस्तानच्या वेगवेगळ्या भागांमध्ये ड्रोन हल्ला झाल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
( नक्की वाचा : 'भारतानं घुसून मारलं', खासदार रडले, नागरिकांचा सैन्यावर संताप, पाकिस्तानमधील भीतीचे पाहा Video )
रावळपिंडीच्या क्रिकेट स्टेडियम परिसरात ड्रोन आदळलं असून याच मैदानात गुरुवारी पाकिस्तान सुपर लीगची मॅच होणार होती. या ड्रोन हल्ल्यामुळे रावळपिंडी स्टेडियम परिसराचे मोठे नुकसान झाल्याचे कळते आहे. या हल्ल्यामुळे या मैदानात होणारा क्रिकेटचा सामना इतरत्र खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गुरुवारी पेशावर झालमी आणि कराची किंग्ज या संघांमध्ये सामना होणार होता. आता हा सामना दुसरीकडे खेळवण्यात येणार आहे.