Pappu Yadav reaction on Son Sarthak Ranjan Viral : आयपीएल 2026 साठी झालेल्या मिनी ऑक्शनमध्ये कोलकाता नाईट रायडर्सने (केकेआर) अनेक मोठ्या खेळाडूंवर बोली लावली. पण, त्यांनी खरेदी केलेल्या एका खेळाडूची सध्या सर्व चर्चा आहे. तो खेळाडू म्हणजे लोकसभा खासदार पप्पू यादव यांचा मुलगा सार्थक रंजन. केकेआरने सार्थकला 30 लाख रुपये या त्याच्या बेस प्राईजवर खरेदी केले आहे.
अबू धाबीमध्ये पार पडलेल्या या लिलावात केकेआरने एकूण 13 खेळाडूंना आपल्या टीममध्ये स्थान दिले असून यामध्ये सार्थकची निवड ही अनेकांसाठी धक्कादायक आणि चर्चेचा विषय ठरली आहे.
पप्पू यादव यांनी व्यक्त केला आनंद
मुलाची आयपीएलसाठी निवड झाल्यानंतर पप्पू यादव यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये सार्थकचे अभिनंदन करताना म्हटले की, अभिनंदन बेटू, आता मनापासून खेळ. तुझ्या कौशल्याच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण कर आणि तुझे स्वप्न पूर्ण कर. आता आमची ओळख तुझ्या नावाने होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. मुलाच्या या यशावर पप्पू यादव प्रचंड आनंदी असल्याचे त्यांच्या या पोस्टमधून दिसून येत आहे.
सार्थक रंजनची क्रिकेटमधील आतापर्यंतची कामगिरी
सार्थक रंजन देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिल्लीच्या संघाचे प्रतिनिधित्व करतो.त्यानं आत्तापर्यंत 2 फर्स्ट क्लास सामने खेळले असून त्यात 28 रन बनवले आहेत. त्यामध्ये त्याची सरासरी 9.33 इतकी आहे. लिस्ट-ए क्रिकेटमध्ये त्याने 4 सामने खेळले असून 26.25 च्या सरासरीने 105 रन केले आहेत. तसेच 5 टी20 सामन्यांमध्ये त्याने 13.20 च्या सरासरीने 66 रन काढले आहेत. आता आयपीएल या जगातील सर्वात टफ T20 लीगमध्ये स्वत:ची प्रतिभा सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे.