IPL 2026: रियान परागला BCCI चा दणका! 'वेपिंग' प्रकरण भोवलं, ड्रेसिंग रूममधील VIDEO मुळे अडचणीत

आयपीएल 2026 मध्ये राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग याच्यावर बीसीसीआयने शिस्तभंगाची कारवाई केली आहे. पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान ड्रेसिंग रूममध्ये ई-सिगरेट (Vaping) ओढल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

जाहिरात
Read Time: 2 mins

IPL 2026: आयपीएल 2026 च्या हंगामात राजस्थान रॉयल्सचा (RR) कर्णधार रियान पराग एका मोठ्या वादात सापडला आहे. मंगळवारी पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यानंतर परागचा ड्रेसिंग रूममध्ये 'वेप' (ई-सिगरेट) वापरतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या प्रकाराची गंभीर दखल घेत बीसीसीआयने (BCCI) परागवर सामन्याच्या शुल्कापैकी 25 टक्के दंड आणि एक डिमेरिट पॉइंट लावला आहे. रियानने आयपीएलच्या आचारसंहितेच्या कलम 2.21 चे उल्लंघन केल्याचे आढळले आहे, जे "खेळाची बदनामी करणाऱ्या वर्तना"शी संबंधित आहे.

काय आहे 'वेपिंग' प्रकरण?

पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान राजस्थानच्या ड्रेसिंग रूममध्ये 24 वर्षीय रियान पराग ई-सिगरेट ओढताना कॅमेऱ्यात कैद झाला होता. बीसीसीआयने या घटनेला लेव्हल-1 चा अपराध मानले आहे. खेळाडूंच्या आचारसंहितेनुसार, स्टेडियम आणि ड्रेसिंग रूमच्या परिसरात कोणत्याही प्रकारचे धुम्रपान किंवा अमली पदार्थांचे सेवन करण्यास सक्त मनाई आहे.

Advertisement

रियानने आपला गुन्हा कबूल केला आणि सामनाधिकारी अमित शर्मा यांनी लादलेली शिक्षा स्वीकारली आहे. आयपीएलची प्रतिष्ठा अबाधित राहावी यासाठी, दोषी संघ, त्याचे अधिकारी आणि खेळाडू यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी बीसीसीआय इतर पर्यायांचाही शोध घेत आहे, अशी माहिती समोर येत आहे. 

परागची खराब कामगिरी 

एकीकडे संघ प्लेऑफच्या शर्यतीत असताना, कर्णधार म्हणून रियान परागची वैयक्तिक कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली आहे. रियानने यंदाच्या सीजनमध्ये 9  सामन्यात केवळ 117 धावा केल्या आहेत. दुसरीकडे राजस्थान 9 सामन्यांपैकी 6 विजय आणि 3 पराभवांसह 12 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. राजस्थान रॉयल्सचा पुढचा सामना शुक्रवारी त्यांच्या घरच्या मैदानावर दिल्ली कॅपिटल्स (DC) विरुद्ध होणार आहे. 
 

Topics mentioned in this article