Yograj Singh :'दाढी कापून फेकेन, पण त्याला नंबर 1 बनवेन'; अर्जुन तेंडुलकरवरून योगराज सिंग यांनी अश्विनला झापलं

IPL 2026 : सर्वकालीन महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरवरुन भारताचे दोन दिग्गज खेळाडू समोरासमोर आले

जाहिरात
Read Time: 3 mins
Yograj Singh : अश्विनवर संतापलेल्या योगराज सिंह यांनी क्रिकेट विश्वाला मोठं चॅलेंज दिलं आहे.
मुंबई:

IPL 2026 : आयपीएल 2026 चा सिझनचं काऊंटडाऊन सुरु झालंय. हा सिझन सुरु होण्यापूर्वी  क्रिकेट वर्तुळात मैदानाबाहेरच्या फटकेबाजीला सुरुवात झाली आहे.सर्वकालीन महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरवरुन भारताचे दोन दिग्गज खेळाडू समोरासमोर आले आहेत. अनुभवी स्पिनर रविचंद्रन अश्विनने अर्जुनच्या आयपीएलमधील भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यानंतर  युवराज सिंहचे वडील आणि माजी क्रिकेटपटू योगराज सिंग यांचा पारा चढला आहे. नेहमीप्रमाणे आपल्या आक्रमक शैलीत योगराज सिंग यांनी अश्विनला खडे बोल सुनावले असून अर्जुन तेंडुलकरला थेट जगातील सर्वोत्कृष्ट बॅटर बनवण्याचे चॅलेंजच देऊन टाकले आहे.

अश्विनचे भाकीत आणि वादाची ठिणगी

आयपीएल 2026 च्या लिलावात लखनौ सुपर जायंट्सने अर्जुन तेंडुलकरला 30 लाख रुपयांना खरेदी केले आहे. यावर भाष्य करताना रविचंद्रन अश्विनने त्याच्या युट्यूब चॅनेलवर एक बेधडक वक्तव्य केले होते. अश्विन म्हणाला होता की, अर्जुन तेंडुलकरला लखनौच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळणे अशक्य आहे. 

Advertisement

लखनौच्या ताफ्यात मयंक यादव, मोहसिन खान, आवेश खान आणि मोहम्मद शमी यांसारखे दिग्गज भारतीय फास्ट बॉलर आधीच उपलब्ध आहेत. टीममधील अनेक खेळाडू दुखापतग्रस्त होत नाहीत, तोपर्यंत अर्जुनला संधी मिळण्याचे कोणतेही कारण दिसत नाही, असे मत अश्विनने व्यक्त केले होते.

( नक्की वाचा : Shane Warne: शेन वॉर्न निघाला खरा 'धुरंधर'; 18 वर्षांपूर्वीच्या एका अटीमुळे कुटुंबावर 460 कोटींचा धनवर्षाव )
 

योगराज सिंग अश्विनवर संतापले

अश्विनचे हे वक्तव्य ऐकताच योगराज सिंग संतापले आहेत. त्यांनी अश्विनचा उल्लेख करताना अत्यंत जहाल शब्दांचा वापर केला. अश्विन कोण आहे आणि तो कोणाबद्दल काय बोलतोय याचे भान त्याने ठेवले पाहिजे, अशा शब्दांत त्यांनी आपला राग व्यक्त केला. 

टीव्हीवर बसून कोणाबद्दलही 'हा हे करू शकत नाही' किंवा 'तो ते करू शकत नाही' असे बोलणे चुकीचे असल्याचे योगराज सिंग यांनी म्हटले आहे. अर्जुन हा केवळ सचिन तेंडुलकरचा मुलगा आहे म्हणून नाही, तर एक खेळाडू म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे त्यांचे मत आहे.

( नक्की वाचा : Anaya Bangar:'वेळ लागला पण.' ऑपरेशननंतर अनाया बांगरची वडिलांसाठी भावूक पोस्ट; बाप-लेकीच्या नात्याचा नवा प्रवास )
 

अर्जुनला बॅटर बनवण्याचे खुले आव्हान

योगराज सिंग यांनी अर्जुन तेंडुलकरच्या बॅटिंगचे कौतुक करताना प्रशिक्षकांवरही निशाणा साधला. अर्जुन जेव्हा गोव्याच्या संघाकडून खेळत होता, तेव्हा तो मोठे सिक्सर खेचत होता, मात्र त्याला केवळ बॉलर म्हणून पाहिले जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. अर्जुनला पाठीच्या कण्याचा त्रास होता, त्यामुळे त्याच्या गोलंदाजीच्या ॲक्शनमध्ये समस्या होती, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

Advertisement

योगराज सिंह यांनी पुढे एक मोठे आव्हान दिले आहे. ते म्हणाले की, जर अर्जुनने माझ्यासोबत फक्त 6 महिने सराव केला, तर तो जगातील सर्व बॅटर्सना मागे टाकेल. जर असे झाले नाही, तर मी माझी दाढी कापून फेकून देईन, असा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे.

लखनौ सुपर जायंट्समधील अर्जुनचा प्रवास

अर्जुन तेंडुलकर गेल्या 3 सीजनपासून मुंबई इंडियन्ससोबत होता. 2023 च्या सीजनमध्ये त्याला 4 सामन्यांत संधी मिळाली होती, ज्यात त्याने 3 विकेट्स घेतल्या होत्या. मात्र, 2024 मध्ये त्याला केवळ 1 सामना खेळायला मिळाला आणि त्यात त्याला एकही विकेट घेता आली नाही. आता नव्या हंगामात तो लखनौच्या संघातून मैदानात उतरणार आहे.ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील या टीममध्ये त्याला खरोखरच प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळते की अश्विनचे भाकीत खरे ठरते, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

Advertisement
Topics mentioned in this article