Ishan Kishan -Aditi Hundia: टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध तुफानी बॅटिंग करून टीम इंडियाला विजय मिळवून देणाऱ्या इशान किशनची सध्या सगळीकडे चर्चा आहे. इशाननं पाकिस्तानच्या बॉलरची धुलाई करत 77 रनची जबरदस्त खेळी केली आणि फॅन्सची मनं जिंकली. या कामगिरीसाठी त्याला 'प्लेयर ऑफ द मॅच'चा पुरस्कारही मिळाला.
इशानचा मैदानात धुमाकुळ सुरु असताना दुसरीकडे सोशल मीडियावर त्याची गर्लफ्रेंड अदिती हुंडिया हिच्यासोबतच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे. विशेष म्हणजे इशानच्या आजोबांनी केलेल्या एका कमेंटमुळे या अफवा अधिक पसरल्या, मात्र त्याच्या आईने आता यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
इशान किशनच्या लग्नाबाबत आईचं स्पष्टीकरण
इशानच्या लग्नाबाबत पसरणाऱ्या बातम्यांवर त्याची आई सुचित्रा देवी यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी सांगितलं की, सध्या ईशानचं वय लग्नाचं नसून त्याने फक्त आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करण्याची ही वेळ आहे. इशानचे आजोबा आता थोडे वृद्ध झाले आहेत आणि वयस्कर माणसं उत्साहात काही गोष्टी बोलून जातात. सोशल मीडियावर त्यांनी जे काही पाहिलं, त्यावरून त्यांनी ते वक्तव्य केलं असावं, असं सुचित्रा देवी यांनी स्पष्ट केलं.
आजोबांनी नक्की काय म्हटलं होतं?
इशानच्या आजोबांनी दिलेल्या एका मुलाखतीत असं म्हटलं होतं की, इशान ज्या कोणाशी लग्न करेल, त्याला आमची पूर्ण संमती आहे. तो ज्या मुलीवर प्रेम करतो, तिला स्वीकारायला आम्ही तयार आहोत. अदिती त्याची गर्लफ्रेंड आहे आणि ती एक मॉडेल आहे. मुलांना ज्यात आनंद मिळतो, तो आनंद आपण स्वीकारला पाहिजे. आजोबांचं हे वक्तव्य सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं आणि तिथूनच इशान लवकरच लग्नबंधनात अडकणार अशा चर्चा सुरू झाल्या.