Uttra Pradesh News : उत्तर प्रदेशमधील बुलंदशहरमध्ये एक दुःखद घटना समोर आली आहे, जिथे राज्यस्तरीय कबड्डी खेळाडू ब्रिजेश सोलंकीचा (28 वर्ष) रेबीजमुळे मृत्यू झाला. ब्रिजेशला एका कुत्र्याच्या पिल्लाने चावा घेतला होता. मात्र किरकोळ घटना समजून ब्रिजेशने रेबीजचे इंजेक्शन घेतले नाही.
ब्रिजेशच्या मृत्यूच्या काही दिवस आधी काढलेल्या एका व्हिडिओमध्ये तो वेदनेने तडफडत असून ओरडत असल्याचे दिसून आले. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, ब्रिजेशचे प्रशिक्षक प्रवीण कुमार यांनी म्हटले की, "ब्रिजेशला वाटले की कुत्र्याच्या चाव्याची दुखापत किरकोळ आहे. त्याने या दुखापतीला गंभीर्यतेने घेतले नाही. म्हणून त्याने लसीकरण देखील केले नाही.
26 जून रोजी, एका सराव सत्रादरम्यान पहिल्यांना ब्रिजेशला त्रास सुरु झाला. त्यावेळी त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. परंतु त्याची प्रकृती बिघडल्यानंतर त्याला नोएडा येथील एका खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. ब्रिजेशला अनेक सरकारी रुग्णालयांमध्ये उपचार नाकारण्यात आल्याचा आरोप त्याचा भाऊ संदीप कुमारने केला.
"अचानक, त्याला पाण्याची भीती वाटू लागली आणि त्याच्यात रेबीजची लक्षणे दिसू लागली. खुर्जा, अलीगढ आणि अगदी दिल्ली येथील सरकारी रुग्णालयांमध्येही आम्हाला उपचार नाकारण्यात आले. फक्त नोएडामध्येच डॉक्टरांनी त्याला रेबीज असल्याची पुष्टी केली," असे ब्रिजेशच्या भावाने सांगितलं. अखेर 28 जून रोजी तडफडून ब्रिजेशचा मृत्यू झाला.
ब्रिजेश सोलंकीच्या मृत्यूने पुन्हा एकदा रेबीजची भीषणता आणि वेळेवर लसीकरणाकडे दुर्लक्ष करण्याचे घातक परिणाम अधोरेखित केले आहेत. ब्रिजेशचा मृत्यू केवळ घटना नाही तर रेबिज हा प्राणघातक आजार किती धोकादायक असू शकतो याचा गंभीर इशारा आहे. रेबीज हा एक विषाणूजन्य आजार आहे जो प्राण्यांच्या चाव्याव्दारे, विशेषतः कुत्र्यांच्या चाव्याव्दारे पसरतो.
कुत्रा चावल्यानंतर लसीकरण
कुत्रा चावल्यानंतर पहिले अँटी-रेबीज इंजेक्शन ताबडतोब, म्हणजे 24 तासांच्या आत द्यावे. साधारणपणे चाव्याच्या दिवशी, तिसऱ्या, सातव्या आणि चौदाव्या दिवशी चार डोसचा कोर्स असतो. गंभीर प्रकरणांमध्ये, रेबीज इम्यून ग्लोब्युलिन देखील दिले जाते. जखम साबण आणि पाण्याने 15 मिनिटे धुणे गरजेचे असते. कारण त्यामुळे विषाणू कमी होऊ शकतात. 72 तासांपेक्षा जास्त उशीर झाल्यास लसीचा परिणाम कमी होऊ शकतो.