Slapgate Video : जगातील सर्वात आव्हानात्मक आणि श्रीमंत क्रिकेट लीग म्हणून आयपीएलची ओळख आहे. गेल्या 18 वर्षांमध्ये सातत्यानं आयपीएलच्या लोकप्रियतेमध्ये भर पडली आहे. पण, आयपीएलच्या पहिल्या सिझनमध्ये (IPL 2008) घडलेल्या एका वादग्रस्त प्रकरणाचा विसर कुणालाही पडलेला नाही. त्या सिझनमधील मुंबई इंडियन्स (MI) आणि किंग्ज इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab) यांच्या सामन्यादरम्यान, MI चा खेळाडू हरभजन सिंगने पंजाबचा फास्ट बॉलर एस. श्रीशांतला (S. Sreesanth) थप्पड मारली होती. ही घटना 'स्लॅपगेट' (slapgate) म्हणून ओळखली जाते. आता, तब्बल 17 वर्षांनी IPL चे संस्थापक आणि माजी अध्यक्ष ललित मोदी यांनी त्या घटनेचा, आजपर्यंत न पाहिलेला, व्हिडिओ जारी केला आहे.
ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार मायकेल क्लार्क यांच्या 'Beyond23 Cricket Podcast' मधील मुलाखतीत, ललित मोदींनी हा व्हिडिओ दाखवला.
मोदी म्हणाले, "सामना संपला होता आणि कॅमेरे बंद झाले होते. पण माझ्या सिक्युरिटी कॅमेऱ्यांपैकी एक सुरू होता. त्यात श्रीशांत आणि भज्जी (हरभजन) यांच्यातील घटना कैद झाली, ज्यात भज्जी त्याला थप्पड मारतो. हा पहा तो व्हिडिओ."
व्हिडिओ दाखवण्यापूर्वी ललित मोदी म्हणाले, "मी 18 वर्षांपासून हा व्हिडिओ बाहेर काढला नव्हता."
हरभननं व्यक्त केला होता खेद
हरभजन सिंगनं नुकताच शांतसोबतच्या 'स्लॅपगेट' घटनेबद्दल खेद व्यक्त केला होता. त्याला संधी मिळाली तर आपल्या कारकिर्दीतून ही एक गोष्ट काढून टाकायला आवडेल, असे तो म्हणाला होता.
रविचंद्रन अश्विनला दिलेल्या मुलाखतीमध्ये हरभजन म्हणाला होता, "माझ्या आयुष्यात काही बदलायचे असेल तर ती श्रीशांतसोबतची घटना आहे. मला ती घटना माझ्या कारकिर्दीतून काढून टाकायची आहे. जे काही घडले ते चुकीचे होते आणि मी जे केले ते करायला नको होते. मी 200 वेळा माफी मागितली आहे. मला अजूनही वाईट वाटते की, त्या घटनेनंतर अनेक वर्षांनीही मला प्रत्येक संधी आणि स्टेजवर माफी मागावी लागते. ती एक चूक होती."
( नक्की वाचा : Mohammed Shami : 'माझ्या निवृत्तीने कुणाचे भले होत असेल तर...' सर्व चर्चांवर मोहम्मद शमीचा मोठा खुलासा )
हरभजन पुढे म्हणाला, "अनेक वर्षांनंतरही मला त्या गोष्टीचा त्रास होतो, जेव्हा मी त्याच्या (श्रीशांतच्या) मुलीला भेटलो. मी तिच्याशी प्रेमाने बोलत होतो आणि ती म्हणाली, 'मला तुमच्याशी बोलायचं नाही. तुम्ही माझ्या वडिलांना मारलं.' त्यावेळी माझ्या ऱ्हदयात कालवाकालव झाली आणि माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी स्वतःला विचारत होतो की मी तिच्यावर काय छाप सोडली आहे? ती माझ्याबद्दल चुकीचा विचार करत असेल, बरोबर? ती मला तिच्या वडिलांना मारणारा व्यक्ती म्हणून पाहते. मला खूप वाईट वाटले. मी अजूनही त्याच्या मुलीची माफी मागतो," असे हरभजनने सांगितले होते.