जाहिरात

Mohammed Shami : 'माझ्या निवृत्तीने कुणाचे भले होत असेल तर...' सर्व चर्चांवर मोहम्मद शमीचा मोठा खुलासा

Mohammed Shami : भारताचा अनुभवी फास्ट बॉलर मोहम्मद शमीने त्याच्या निवृत्तीच्या विषयावर स्पष्टीकरण दिलं आहे.

Mohammed Shami :  'माझ्या निवृत्तीने कुणाचे भले होत असेल तर...' सर्व चर्चांवर  मोहम्मद शमीचा मोठा खुलासा
Mohammed Shami : मोहम्मद शमीची आशिया कपसाठी निवड झालेली नाही.
मुंबई:

Mohammed Shami : भारताचा अनुभवी फास्ट बॉलर मोहम्मद शमीने त्याच्या निवृत्तीच्या विषयावर स्पष्टीकरण दिलं आहे.  गेल्या काही महिन्यांमध्ये आर. अश्विन आणि चेतेश्वर पुजारा हे दोन दिग्गज क्रिकेटपटू सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त झाले. तर रोहित शर्मा आणि विराट कोहलीनं टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. दुखापतीमुळे बराच काळ टीम इंडियाच्या बाहेर असलेल्या शमीच्या भवितव्यावरही प्रश्न उपस्थित केले जात आहे. विशेषत: आशिया कप स्पर्धेत निवड न झाल्यानं ही चर्चा सुरु झालीय.

काय म्हणाला शमी?

मोहम्मद शमीने  न्यूज24 शी बोलताना स्पष्ट केले की, तो अजूनही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी उत्सुक असून, त्यासाठी गरज पडल्यास देशांतर्गत क्रिकेट खेळायलाही तयार आहे.

शमी यावेळी बोलताना म्हणाला की "माझ्या निवृत्तीमुळे कोणाचे आयुष्य चांगले होणार असेल, तर मला सांगा. मी कोणाच्या वाटेत अडथळा बनलो आहे का? ज्या दिवशी मला क्रिकेटचा कंटाळा येईल, त्या दिवशी मी सोडून देईन. तुम्ही मला आंतरराष्ट्रीय संघात घेतले नाही, तरीही मी देशांतर्गत क्रिकेट खेळत राहीन," असे शमीने ठामपणे सांगितले.

( नक्की वाचा : Mohammed Shami : 'स्त्रीलंपट, रखेलच्या मुलीवर...' मोहम्मद शमीवर माजी पत्नीचे खळबळजनक आरोप )
 

2027 च्या विश्वचषकाचे स्वप्न

शमीने 2023 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील भारताच्या पराभवावरही भाष्य केले. "माझे एकच स्वप्न आहे, ते म्हणजे वन-डे वर्ल्ड कप जिंकणे. मला वर्ल्ड कप विजेत्या टीमचा भाग व्हायचं आहे.  2023 मध्ये आम्ही खूप जवळ पोहोचलो होतो, पण नशिबाने साथ दिली नाही," अशी खंत त्याने व्यक्त केली. शमीने 2027 च्या वर्ल्ड कपसाठी तयारी करत असल्याचे सांगितले.

फिटनेसवर काम करत आहे

गेल्या दोन महिन्यांपासून आपल्या फिटनेसवर काम करत असल्याचे शमीने सांगितले. "गेले 2 महिने मी खूप मेहनत घेतली आहे. वजन कमी केले आहे आणि बॉलिंगचा सरावही वाढवला आहे. सध्या मी पूर्णपणे तंदुरुस्त आहे आणि मोठ्या स्पेलसाठी सज्ज आहे. बॉलिंगसह मी बॅटींग आणि फिल्डिंगचा भरपूर सराव केला आहे," असे शमी म्हणाला.

दुखापतीची भीती

इंग्लंड दौऱ्यातून माघार घेण्याच्या निर्णयावरही त्याने स्पष्टीकरण दिले. "मी इंग्लंड दौऱ्यासाठी तयार होतो, पण ऐनवेळी त्रास जाणवू लागल्यामुळे मी माघार घेतली. 2015 च्या वर्ल्डकप दरम्यानच्या गुडघ्याच्या ऑपरेशननंतर मी खूप त्रास सहन केला आहे. 2023 मध्येही मी वेदनेसह खेळलो, त्यामुळे पुन्हा तशी चूक करायची नाही," असे शमी म्हणाला. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com