Lionel Messi's India Tour : जगप्रसिद्ध फुटबॉलपटू म्हणून प्रसिद्धी मिळवणाऱ्या लिओनेल मेस्सीच्या भारत दौऱ्याला अखेर अंतिम मंजुरी मिळाली आहे. या दौऱ्याची सुरुवात 12 डिसेंबर रोजी कोलकाता शहरातून होणार असून, मेस्सी फुटबॉलप्रेमींना भेटण्यासाठी सज्ज झाला आहे. कार्यक्रमाचे प्रवर्तक सताद्रू दत्ता यांनी शुक्रवारी (ऑगस्ट 15) ही माहिती दिली, ज्यामुळे देशभरातील चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
'GOAT Tour of India 2025' असे नाव दिलेल्या या दौऱ्याची सुरुवात कोलकाता येथून होईल. त्यानंतर मेस्सी अहमदाबाद, मुंबई आणि नवी दिल्ली येथे जाईल. 15 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेऊन या दौऱ्याचा समारोप होईल. 2011 नंतर मेस्सीचा हा पहिला भारत दौरा आहे, तेव्हा तो आपल्या राष्ट्रीय संघासोबत कोलकाता येथे व्हेंझुएलाविरुद्ध एक मैत्रीपूर्ण सामना खेळण्यासाठी आला होता.
काय आहे दौऱ्याचा उद्देश?
दत्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, "मला या दौऱ्याची अधिकृत परवानगी मिळाली आहे. मेस्सी स्वतः सोशल मीडियावर अधिकृत पोस्टर जारी करून या दौऱ्याची माहिती देणार असल्याचे सांगण्यात आले आहे." दत्ता यांनी मेस्सीच्या वडिलांशी संपर्क साधू त्यांना या दौऱ्याचा प्रस्ताव दिला होता, त्यानंतर मेस्सीने दत्ता त्यांच्याशी 45 मिनिटे चर्चा केली आणि दौऱ्यासाठी होकार दिला. मेस्सीसोबत त्याचे इंटर मियामी संघसहकारी रोड्रिगो डी पॉल, लुईस सुआरेझ, जॉर्डन अल्बा आणि सर्जियो बुस्केट्स हेही दौऱ्यात सहभागी होऊ शकतात, अशी शक्यता आहे.
(नक्की वाचा : IND vs PAK: 'इतकं बेकार मारतील...', पाकिस्तान घाबरला! माजी खेळाडूनं केली मॅच न होण्याची प्रार्थना )
मेस्सीच्या दौऱ्याचा मुख्य उद्देश भारतीय फुटबॉलपटूंच्या पुढील पिढीला प्रेरणा देणे हा आहे. मेस्सी प्रत्येक शहरात मुलांसाठी 'मास्टरक्लास' घेणार आहे. 12 डिसेंबर रोजी रात्री मेस्सीचे कोलकाता येथे आगमन होईल. 13 डिसेंबर रोजी तो इथल्या एका कार्यक्रमात सहभागी होईल. मेस्सीच्या दौऱ्यादरम्यान त्याच्या पुतळ्याचे अनावरणही करण्यात येणार आहे, 'GOAT कॉन्सर्ट' आणि 'GOAT कप' यांसारखे कार्यक्रमही त्याच्या दौऱ्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आले आहेत.