मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वानखेडे स्टेडियमवरील स्टँडला अजित वाडेकर, रोहित शर्मा आणि शरद पवार यांचं नाव देण्यात आलं आहे. त्याबाबतचा खास कार्यक्रम आज (गुरुवार, 16 मे) पार पडला. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व क्रिकेट फॅन्सला आनंद देणारी एक मोठी घोषणा केली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मुंबईकरांसाठी एक लाख प्रेक्षक क्षमतेचं स्टेडियम उभारण्यासाठी राज्य सरकार सर्व प्रकारचं सहकार्य करेल, अशी घोषणा मुख्यंंत्र्यांनी केली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी तसा प्रस्ताव सादर करावा, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली.
लॉर्ड्सला जागतिक क्रिकेटची पंढरी म्हंटलं जातं. पण, खऱ्या अर्थानं क्रिकेटची पंढरी हे मुंबईतील वानखेडे स्टेडियम आहे. क्रिकेटचा देव म्हणजेच सचिन तेंडुलकरचा पुतळा या स्टेडियमच्या दारात आहे, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
( नक्की वाचा : देवेंद्र फडणवीसांकडून शरद पवारांचं कौतुक! वानखेडेवर मुख्यमंंत्र्यांची जोरदार बॅटिंग )
हे स्टेडियम आयकॉनिक व्हावं. एक लाख लोकं बसतील असं एक मोठं स्टेडियम बसतील अशी जागा आम्ही देऊ. मुंबईनं क्रिकेटला जे दिलंय ते सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे आणखी एका स्टेडियमचा नक्की विचार करु. मुंबई क्रिकेट असोसिएशनला चार वर्षांनी शंभर वर्ष पूर्ण होतील त्यावेळी नवं स्टेडियम उभं राहिलं पाहिजे असा प्रयत्न केला पाहिजे, त्यासाठी राज्य सरकार सर्व प्रकारची मदत करेल, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं.
रोहित शर्माचा फॅन
भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्माचा मी फॅन असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना सांगितलं. त्यांनी सलग दोन आंतरराष्ट्रीय स्पर्धा भारताला जिंकून दिल्या. आपल्या अपूर्ण इच्छा त्यांच्या कॅप्टनसीमध्ये पूर्ण झाल्या. त्यांचं मैदानावरील वागणं मोकळं असतं. त्यामुळे त्यांनी वेगळी प्रतिमा केली आहे. भारताच्या सर्वोत्तम कॅप्टनच्या यादीमध्ये रोहित शर्मा कधी जाऊन बसले हे कळालेच नाही.
रोहित शर्मानं बॅटिंग करताना मारलेला फटका थेट रोहित शर्मा स्टँडला कधी लागतो याची आम्ही वाट पाहत आहोत. MCA च्या इतिहासात सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूच्या नावाचं स्टँड होतंय, हा दुर्मीळ क्षण आहे. त्यासाठी रोहित पात्र आहे. यामुळे ते अधिक चांगलं खेळतील आणि अधिक काळ खेळतील, अशी आशा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.