Jasprit Bumrah To Quit Test Cricket? : सध्याच्या टीम इंडियातील नंबर 1 बॉलर कोण? असा प्रश्न विचारला की सर्वजण जसप्रीत बुमराहचं नाव एकमुखानं घेतील. क्रिकेटमधील सर्व प्रकारात बुमराहचं त्याचं श्रेष्ठत्व वारंवार सिद्ध केलंय. इंग्लंड विरुद्धच्या सीरिजमध्येही हेडिंग्ले आणि लॉर्ड्स टेस्टमध्ये बुमराहनं दमदार कामगिरी केली होती. पण सध्या मँचेस्टरमध्ये सुरु असलेल्या टेस्टमध्ये आत्तापर्यंत तो प्रभावी ठरलेला नाही. बुमराह वर्कलोड मॅनेजमेंट करण्यासाठी मोजक्याच टेस्ट खेळतो. पण, तो सध्या 31 वर्षांचा आहे. त्यामुळे आणखी बराच काळ हा प्रकार खेळेल अशी फॅन्सना आशा आहे. बुमराह आणि टीम इंडियाच्या फॅन्सची काळजी वाढवणारं वक्तव्य माजी भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद कैफनं केलं आहे.
बुमराह लवकरच टेस्ट क्रिकेटला अलविदा करु शकतो. असा दावा कैफनं केलाय. त्यासाठी कैफनं काही ठोस कारणंही दिली आहेत. "मला वाटते की येत्या टेस्ट मॅचमध्ये बुमराह खेळताना दिसणार नाही आणि तो निवृत्ती घेऊ शकतो,'' असा अंदाज कैफनं व्यक्त केला आहे.
(नक्की वाचा : Jasprit Bumrah : शुबमन गिल कॅप्टन कसा झाला? जसप्रीत बुमराहनं सांगितली Inside Story )
दुखापतीमुळे त्रस्त?
कैफनं सांगितलं की, 'बुमराह दुखापतीमुळे त्रस्त आहे. याच कारणामुळे मँचेस्टर कसोटीत तो त्याच्या लौकिकाला साजेशी बॉलिंग करताना दिसला नाही. कैफनं बुमराहचं "स्वाभिमानी व्यक्ती" असं वर्णन केलंय. ''जेव्हा त्याला वाटेल की तो टीमच्या विजयात 100% योगदान देऊ शकत नाही, तेव्हा तो स्वतःच खेळण्यास नकार देईल,'' असं कैफनं सांगितलं.
"बुमराहमध्ये अजूनही देशासाठी खेळण्याची तीच जिद्द आहे. पण तो शरीराने हरला आहे. फिटनेसने हरला आहे. त्याचे शरीर साथ देत नाहीये. त्यामुळे मला वाटते की तो लवकरच टेस्ट क्रिकेट खेळण्यास नकार देऊ शकतो," असं कैफ म्हणाला.
मँचेस्टर टेस्टचं उदाहरण
कैफने यावेळी मँचेस्टर कसोटीचे उदाहरणही दिले आहे. त्यांच्या मते, विकेट न मिळणे सामान्य आहे, पण ज्या वेगाने तो गोलंदाजी करत होता तो खूप कमी होता. विकेटकीपर ध्रुव जुरेलने त्याच्या गोलंदाजीवर जेमी स्मिथचा झेल ज्या प्रकारे पुढे सूर मारून पकडला, ते या गोष्टीचे संकेत देत आहे की बुमराह पूर्णपणे तंदुरुस्त नाही, असं कैफनं स्पष्ट केलं.