Mohammed Shami : टीम इंडियाचा हिरो शरियतचा गुन्हेगार! का संतापले मौलाना?

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

टीम इंडियाचा फास्ट बॉलर मोहम्मद शमीचा (Mohammed Shami) एक फोटो सध्या वेगानं व्हायरल होत आहे. या फोटोत शमी ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सेमी फायनलच्या दरम्यान एनर्जी ड्रिंक पिताना दिसत आहे. रमजान महिन्यात मुस्लीम धर्मीय रोजा ठेवतात. त्याच रमजान महिन्यात हा फोटो व्हायरल झाल्यानं वाद सुरु झालाय. अनेक मौलाना शमीनं रोजा ठेवला नाही म्हणून त्याचा विरोध करत आहेत. या विषयावर राजकारण सुरु झालं असून भाजपानं शमीला पाठिंबा दिला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

शरियतचा गुन्हेगार

मोहम्म शमीनं ज्यूस पित असल्याचं दिसल्यानं ऑल इंडिया मुस्लीम जमातचे अध्यक्ष मौलाना शहाबुद्दीन रझवी यांनी नाराजी व्यक्त केलीय. त्यांनी एक पत्रक प्रसिद्ध केलंय. त्यामध्ये रझवी यांनी सांगितलं की, 'रोजा हे इस्लामचं कर्तव्य आहे. एखादा व्यक्ती जाणीवपूर्वक रोजा करत नसेल तर तो गुन्हेगार आहे. रोजा ठेवणे हे त्याचं कर्तव्य आहे. त्यानं रोजा न केल्यानं मोठा गुन्हा केलाय. तो शरियतच्या दृष्टीनं गुन्हेगार आहे.' अशी टीका त्यांनी केलीय.

शमीच्या भावानं दिलं उत्तर

शमीवर होत असलेल्या टीकेला त्याच्या भावानं उत्तर दिलंय. 'भाऊ सध्या दुबईत खेळतोय. दुबईचा प्रवास बराच आहे. या मौलानाला माहिती असेल जेव्हा कुणी 70 किलोमीटर किंवा त्यापेक्षा जास्त प्रवास करत असेल तर तो रोजा सोडतो. त्याचे काही नियम असतात. काही जण नंतरही रोजा ठेवू शकतात. माझ्यासाठी हा कोणता मोठा मुद्दा नाही. 

ही लोकं प्रत्येक गोष्टीला इस्लामच्या विरोधात असल्याचा रंग देतात. पण, प्रत्यक्षात असं काही नाही. इस्लाममध्ये आणखी देखील काही गोष्टी आहेत. लोकं त्या पाळत नाही. मौलाना साहेबांनी त्या गोष्टींना गांभीर्यानं घ्यावं. लोकांना जागरुक करावं.' असं शमीचा भाऊ मोहम्मद जैदनं सांगितलं. 

Advertisement

( नक्की वाचा :  Gautam Gambhir : रोहित शर्मावर प्रश्न विचारणाऱ्या पाकिस्तानी पत्रकाराची गंभीरनं केली बोलती बंद )

मोहम्मद शमीनं रोजा ठेवला नसल्याबद्दल भाजपानंही प्रतिक्रिया दिली आहे. 'हा कोणत्याही व्यक्तीचा खासगी मुद्दा आहे. तो कोणतं व्रत ठेवेल. पूजा कशी करेल हे तो स्वत: ठरवेल. तो रोजा ठेवणार की नाही हे त्या व्यक्तीच्या इच्छेवर अवलंबून आहे. कोणताही व्यक्ती किंवा धर्माचे ठेकेदार हे निश्चित करु शकत नाही.  ही गुंडगिरी यापुढे चालणार नाही, आता हे सर्व थांबेल. हे यापुढे चालणार नाही. क्रिकेटपटू देशासाठी खेळतोय हे मौलानाला सहन होत नाही,' असं भाजपाचे प्रवक्ते राकेश त्रिपाठी यांनी सांगितलं.

Advertisement

सोशल मीडियावर वाद

मोहम्मद शमीच्या फोटोवरुन सोशल मीडियावरही जोरदार वाद होत आहे. काही जणांनी त्यांना पाठिंबा दिलाय. तर काही जणांनी शमीनं रोजा ठेवला पाहिजे. धर्माला महत्त्व द्यायला हवं, असा सल्ला दिला आहे. देशासाठी खेळणं ही मोठी गोष्ट आहे. एखादा खेळाडूनं स्वत:ला मॅचच्या दरम्यान फ्रेश आणि फिट ठेवण्यासाठी काय करानं हा त्याचा निर्णय आहे. त्यावर कोणताही वाद होऊ नये,' असं मत शमीच्या फॅन्सनी सांगितलं. 

Topics mentioned in this article