आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) अध्यक्ष आणि पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसीन नक्वी यांनी अखेर आशिया कपची विजयी ट्रॉफी यूएई क्रिकेट बोर्डाकडे सुपूर्द केली आहे. टीम इंडियाने विजेतेपद पटकावूनही नक्वी यांनी ही ट्रॉफी स्वतःसोबत घेऊन गेल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. मात्र, ट्रॉफी टीम इंडियाला कधीपर्यंत मिळेल, याबद्दलची नेमकी स्थिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.
बीसीसीआय उचलणार कठोर पाऊल
मोहसीन नक्वी यांनी आशिया कपच्या फायनलनंतर केलेल्या कृतीमुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) अत्यंत नाराज आहे. बीसीसीआय नक्वी यांना माफ करण्याच्या मूडमध्ये नाही. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआय (BCCI) एशियन क्रिकेट कौन्सिल (ACC) चे प्रमुख मोहसीन नक्वी यांच्याविरोधात महाभियोग (Impeachment) आणण्याचा विचार करत आहे.
NDTV च्या सूत्रांनुसार, नक्वी यांच्या वर्तनाने एसीसी (ACC) आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) प्रतिष्ठेचे नुकसान केले आहे. बीसीसीआय (BCCI) सचिव देवजीत सैकिया यांनी नकवी यांचे वर्तन 'अनुचित आणि असभ्य' असल्याचे म्हटले आहे. येत्या ICC च्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित करणार असल्याचेही सैकिया यांनी सांगितले.
काय आहे संपूर्ण वाद?
आशिया कप 2025 च्या ट्रॉफीवरून हा संपूर्ण वाद सुरू आहे. 28 सप्टेंबर रोजी दुबई येथे भारत आणि पाकिस्तान यांच्यात अंतिम सामना झाला, ज्यात टीम इंडियाने विजय मिळवला. मात्र, भारताने मोहसीन नक्वी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला होता. त्यानंतर काही वेळातच नक्वी ट्रॉफी आणि पदके घेऊन त्यांच्या हॉटेलवर निघून गेले होते.
नक्वी यांच्या या बेजवाबदार वागणुकीनंतर संपूर्ण क्रिकेट जगाला धक्का बसला आहे. . बीसीसीआयने (BCCI) यावर आपली भूमिका स्पष्ट करत म्हटले आहे की, "आम्हाला ट्रॉफी दिली जावी. अन्यथा, गरज पडल्यास आम्ही ती थेट ACC च्या कार्यालयातून घेऊन येऊ."
( नक्की वाचा : 27 सेंच्युरी, 7885 रन्स! तरीही दुर्लक्ष का? टीम इंडियाच्या 'चक्रव्युहा'त अडकला 'अभिमन्यू' )
नक्वींकडे एकाच वेळी तीन मोठी पदे
मोहसीन नक्वी हे सध्या एसीसी (ACC) चे अध्यक्ष असण्यासोबतच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) देखील अध्यक्ष आहेत. विशेष म्हणजे ते पाकिस्तानचे गृहमंत्री हे पदही सांभाळत आहेत.फायनलमध्ये पाकिस्तानचा पराभव झाल्यानंतर अनेक माजी क्रिकेटपटूंनी नकवी यांना PCB अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास सांगितले आहे, पण नक्वी यांनी या विषयावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.