मुंबईनं कोरलं इराणी ट्रॉफीवर नाव, 27 वर्षांचा दुष्काळ संपवण्यात अजिंक्यच्या टीमला यश

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

देशांतर्गत क्रिकेटमधील दिग्गज टीम समजल्या जाणाऱ्या मुंबईनं इराणी ट्रॉफी पटकावली आहे. लखनौमध्ये झालेल्या सामन्यात मुंबईनं पहिल्या इनिंगमधील आघाडीच्या जोरावर इराणी ट्रॉफी जिंकली. 

इराणी कप स्पर्धेच्या इतिहासात पंधराव्यांदा तर एकविसाव्या शतकात पहिल्यांदाच ही स्पर्धा मुंबईला पहिल्यांदाच यश मिळालं. मुंबईनं यापूर्वी ही स्पर्धा 1997 साली जिंकली होती.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वाखालील खेळणाऱ्या रणजी विजेत्या मुंबईनं पहिल्या इनिंगमध्ये 537 रन केले होते. त्याचा पाठलाग करताना शेष भारताची पहिली इनिंग 416 वर संपुष्टात आली. मुंबईला पहिल्या इनिंगमध्ये 121 रनची आघाडी मिळाली. ही आघाडी विजेतेपदासाठी निर्णयाक ठरली.

पहिल्या इनिंगमध्ये आघाडी घेतल्यानंतर मुंबईनं दुसऱ्या इनिंगमध्ये कोणताही धोका न पत्कारता 8 आऊट 329 रन केले. त्यावेळी दोन्ही टीमनं सामना थांबवण्याचा निर्णय घेतला. मुंबईकडून दुसऱ्या इनिंगमध्ये तनुष कोटियननं सेंच्युरी झळकाली. तो 114 रनवर नॉट आऊट होता. तर मोठ्या कालावधीनंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये परतलेल्या पृथ्वी शॉनं 76 रन केले. 

मुंबईकडून पहिल्या इनिंगमध्ये 222 रनची खेळी करणाऱ्या सर्फराज खानला 'प्लेयर ऑफ द मॅच'चा पुरस्कार देण्यात आला. इराणी कपच्या इतिहासात मुंबईकडून डबल सेंच्युरी करणारा सर्फराज हा पहिलाच बॅटर आहे. शेष भारताकडून अभिमन्यू इश्वरननं कडवा प्रतिकार करत 191 रनची खेळी केली. पण, त्याचे प्रयत्न अपुरे ठरले. 

( नक्की वाचा :  गावस्कर ते तेंडुलकरपर्यंत कुणालाही जमलं नाही ते सर्फराजनं केलं, Video )

गेली 27 वर्ष मुंबईला हुलकावणी देणाऱ्या इराणी ट्रॉफी जिंकण्यात मुंबईला अखेर यश आलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कॅप्टन म्हणून स्वत:चा ठसा उमटवलेल्या अजिंक्य रहाणेनं मुंबईचा कॅप्टन म्हणून हे यश मिळवून दिलंय. 

Topics mentioned in this article