Hardik Pandya: हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्स संघ सोडणार? रोहितकडे मोठी जबाबदारी? MI मध्ये चाललंय काय?

Hardik Pandya to Leave MI: इंडियन प्रीमियर लीगच्या हंगामात 14 सामन्यांपैकी अवघ्या 4 लढती जिंकून 9व्या स्थानावर समाधान मानावे लागलेल्या मुंबई इंडियन्स संघात मोठे फेरबदल होणार आहेत.

जाहिरात
Read Time: 3 mins
Hardik Pandya to Leave Mumbai Indians

आयपीएल 2026 मधील अत्यंत सुमार कामगिरीनंतर पाच वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्स (MI) संघात आतापर्यंतचे सर्वात मोठे संकट उभे राहिले आहे. या हंगामात मुंबईला 14 सामन्यांत केवळ 4 विजय मिळवता आले आणि संघ गुणतालिकेत 9व्या क्रमांकावर फेकला गेला. या खराब कामगिरीनंतर आता अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याला कर्णधारपदावरून हटवण्याची पूर्ण तयारी व्यवस्थापनाने केली असल्याची माहिती मिळत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, व्यवस्थापनासोबत असलेल्या मतभेदांमुळे स्वतः हार्दिक पंड्या हा मुंबई इंडियन्स संघ सोडण्याचा विचार करत असल्याची माहिती समोर आली आहे.

'एनडीटीव्ही'ने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, हार्दिक पंड्या आगामी काळात दुसऱ्या फ्रँचायझीमध्ये जाण्यासाठी ट्रान्सफरची मागणी करणार आहे. 2024 च्या हंगामापूर्वी रोहित शर्माच्या जागी हार्दिकला कर्णधार बनवण्याचा निर्णय मुंबई इंडियन्ससाठी पूर्णपणे चुकला होता. आता व्यवस्थापनाला आपल्या चुकीची जाणीव झाली असून हार्दिकच्या जागी नव्या नेतृत्वाचा शोध सुरू झाला आहे.

रोहित पुन्हा कर्णधार होणार नाही

हार्दिक पंड्या बाहेर पडणार हे स्पष्ट झाल्यावर आता मुंबई इंडियन्सचा पुढील कर्णधार कोण? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. एका माजी भारतीय खेळाडू आणि अव्वल प्रशिक्षकाने नाव न सांगण्याच्या अटीवर स्पष्ट केले की, मुंबई इंडियन्सचा पुढील कर्णधार तोच असेल ज्याला रोहित शर्माचा पूर्ण पाठिंबा असेल.

Advertisement

व्यवस्थापनाने रोहितला पुन्हा कर्णधार बनवण्याचा विचार केला तरी रोहित शर्मा स्वतः पुन्हा कर्णधारपदाचा 'यू-टर्न' घेणार नाही, हे आता निश्चित झाले आहे. मुंबई इंडियन्सचा सर्वात मोठा चेहरा असलेला रोहित शर्मा हाच आता संघाचा नवा कर्णधार निवडण्यात सर्वात महत्त्वाची आणि निर्णायक भूमिका बजावणार आहे.

नव्या कर्णधारपदासाठी 3 दावेदार

तिलक वर्मा : तरुण डाव्या हाताचा फलंदाज सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. मुंबई इंडियन्सला दीर्घकाळासाठी नेतृत्व हवे असल्यास तिलक वर्माच्या नावाचा प्राधान्याने विचार केला जाऊ शकतो. त्याने संघात आपले स्थान पक्के केले आहे.

जसप्रीत बुमराह : मुंबई इंडियन्सचा सर्वात वरिष्ठ आणि मॅचविनर गोलंदाज. सीनियरिटी आणि सर्वोत्तम कामगिरीच्या जोरावर बुमराह कर्णधारपदाचा सर्वात प्रबळ दावेदार आहे. त्याच्याकडे भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व करण्याचा अनुभवही पाठीशी आहे. 

सूर्यकुमार यादव : मुंबई इंडियन्सला जर अनुभवी आणि त्वरित पर्याय हवा असल्यास 'सूर्या' उत्तम पर्याय ठरू शकतो. सूर्यकुमारने आंतरराष्ट्रीय टी-20 फॉर्मेटमध्ये उत्कृष्ट नेतृत्व सिद्ध केले असून त्याच्याच कप्तानीखाली भारताने टी-२० वर्ल्ड कपचे विजेतेपदही पटकावले आहे. |

Advertisement

आशिष नेहरा मुंबईत येणार का?

हार्दिक पंड्यासोबत गुजरात टायटन्सचे मुख्य प्रशिक्षक आशिष नेहरा यांनाही मुंबई इंडियन्सने आपल्या संघात घ्यावे का, असे विचारले असता सूत्रांनी सांगितले की, आयपीएलमध्ये दुसऱ्या फ्रँचायझीमधून थेट प्रशिक्षक किंवा कर्णधार तोडणे इतके सोपे नसते. त्यामुळे आशिष नेहरा मुंबईत येण्याची शक्यता नाही. मुंबई इंडियन्समध्ये हार्दिक पंड्याच्या भविष्याबाबत आणि नव्या कर्णधाराच्या अधिकृत घोषणेबाबत पुढील काही आठवड्यांत ठोस अपडेट येण्याची शक्यता आहे.
 

Topics mentioned in this article