Neeraj Chopra Javelin Throw Live: नीरज चोप्रा-अर्शद नदीम आमने-सामने, कोण होणार चॅम्पियन? कुठे पाहता येईल लढत?

टोकियोचे नॅशनल स्टेडियम हे नीरज चोप्रासाठी खूपच खास आहे, कारण याच मैदानावर त्याने 2021 च्या ऑलिंपिकमध्ये भारतासाठी अॅथलेटिक्समध्ये पहिले सुवर्णपदक जिंकले होते.

जाहिरात
Read Time: 2 mins

Neeraj Chopra vs Arshad Nadeem Javelin Throw Live : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पारंपरिक स्पर्धा पुन्हा एकदा मैदानावर अनुभवायला मिळणार आहे, पण यावेळी क्रिकेटच्या मैदानावर नाही, तर ऍथलेटिक्सच्या भालाफेकीच्या मैदानात. दोनवेळा ऑलिंपिक पदक विजेता नीरज चोप्रा आणि पॅरिस ऑलिंपिक चॅम्पियन अर्शद नदीम हे टोकियो येथे सुरू असलेल्या जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या पुरुषांच्या भालाफेकीच्या अंतिम फेरीत आमने-सामने येणार आहेत. टोकियोचे नॅशनल स्टेडियम हे नीरज चोप्रासाठी खूपच खास आहे, कारण याच मैदानावर त्याने 2021 च्या ऑलिंपिकमध्ये भारतासाठी अॅथलेटिक्समध्ये पहिले सुवर्णपदक जिंकले होते.

सामना कधी आणि कुठे पाहता येईल?

नीरज चोप्रा विरुद्ध अर्शद नदीम यांचा हा बहुप्रतिक्षित अंतिम सामना आज, गुरुवार, 18 सप्टेंबर रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी 3:53 वाजता टोकियो नॅशनल स्टेडियमवर सुरू होईल. हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपित केला जाईल आणि तुम्ही तो JioCinema ॲपवर लाईव्ह स्ट्रीम करू शकता.

पात्रता फेरीत दोन्ही खेळाडूंची कामगिरी

पात्रता फेरीत नीरज चोप्राने दमदार कामगिरी करत पहिल्याच प्रयत्नात 84.85 मीटरची भालाफेक करून अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित केले. अंतिम फेरीसाठी 84.50 मीटरचा निकष होता, जो नीरजने सहज पार केला. दुसरीकडे, पाकिस्तानचा खेळाडू अर्शद नदीम सुरुवातीला थोडा संघर्ष करताना दिसला. त्याचे पहिले दोन प्रयत्न 80 मीटरपेक्षा कमी होते. मात्र, तिसऱ्या आणि निर्णायक प्रयत्नात त्याने 85.28 मीटरची शानदार फेक करत अंतिम फेरी गाठली.

जागतिक विजेतेपद राखण्याचे आव्हान

नीरज चोप्रा या स्पर्धेत आपला किताब वाचवण्यासाठी मैदानात उतरणार आहे. जर त्याने टोकियोत पुन्हा सुवर्णपदक जिंकले, तर सलग दोन वेळा जागतिक चॅम्पियनशिप जिंकणारा तो जगातील तिसरा भालाफेकपटू ठरेल. याआधी हा पराक्रम झेक प्रजासत्ताकचा महान खेळाडू जॅन झेलेझनी (1993, 1995) आणि ग्रेनेडाचा अँडरसन पीटर्स (2019, 2022) यांनी केला आहे.
 

Advertisement