Novak Djokovic Big Statement: ऑस्ट्रेलियन ओपन ही वर्षातील पहिली ग्रँडस्लॅम सुरु होण्यापूर्वी नोव्हाक जोकोविचनं एक खळबळजनक दावा केला आहे. टेनिसमध्ये सर्वात जास्त 24 ग्रँडस्लॅम जिंकण्याचा विक्रम जोकोविचच्या नावावर आहे. त्यानं केलेल्या या दाव्यानं संपूर्ण क्रीडा विश्वाला धक्का बसला आहे.
जोकोविचनं 2022 मधील ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा सुरु होण्यापूर्वी झालेल्या वादाला पुन्हा एकदा तोंड फोडलं आहे. जोकोविचला तीन वर्षांपूर्वी ही स्पर्धा सुरु होण्यापूर्वी चुकीची माहिती दिल्याबद्दल ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यानंतर त्याचा व्हिसा रद्द करुन मायदेशी पाठवण्यात आलं होतं. या कालावधीमध्ये मला विष देण्यात आलं होतं, असा दावा जोकोविचनं केला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
केंव्हा आणि कधी दिलं विष?
37 वर्षांच्या महान टेनिसपटूनं GQ (गोल्ड क्वेस्ट मासिक) ला बोलताना सांगितलं की, 'मला वाटले की, मेलबर्नमधील हॉटेलमध्ये मला दिलेले अन्न विषाने भरलेले होते. माझ्या अन्नात धातूचे प्रमाण जास्त आढळले. जड धातू, शिसे आणि पाऱ्याची पातळी खूप जास्त होती.'
जोकोनं पुढं सांगितलं की, ऑस्ट्रेलियातून परतल्यानंतर मला भयंकर ताप आला होता. त्याचा मला खूप त्रास झाला. सर्बियामध्ये परतल्यानंतर मी काही टेस्ट केल्या होत्या. त्यावेळी त्यामध्ये शीसे आणि मर्करीसारखे धातू आढळले होते. जोकोविचनं 2022 साली ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा खेळली नव्हती.
2022 मध्ये सर्व जगाला कोरोना व्हायरसचा विळखा होता. ऑस्ट्रेलियात कोव्हिड -19 बाबत कठोर नियामवली तयार करण्यात आली होती. पण, जोकोविच स्पर्धा सुरु होण्यापूर्वी लस घेऊन ऑस्ट्रेलियात आला नव्हता. त्यानं नियमांचं पालनं केलं नव्हतं. त्यामुळे त्याला ऑस्ट्रेलियातून परत पाठवण्यात आले होते.
( नक्की वाचा : संपूर्ण भारताचं वर्ल्ड कप विजेतेपदाचं स्वप्न ज्यानं तोडलं, तो झाला अखेर निवृत्त )
आता फक्त टेनिसवर फोकस
जोकोविचननं 2023 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये दमदार कमबॅक करत त्या सिझनचं विजेतेपद पटकावलं. यंदा त्याला 11 वे ऑस्ट्रेलियन ओपन आणि 25 वे ग्रँडस्लॅम जिंकण्याची संधी आहे. जोकोविच यावेळी बोलताना पुढं म्हणाला की, 'मी मागील काही वेळा जेव्हा ऑस्ट्रेलियात आलोय त्यावेळी पासपोर्ट कंट्रोलकडं जातो, त्यावेळी जुन्या आठवणी ताज्या होतात. इमिग्रेशनमधून जातानाही मला अस्वस्थ वाटतं.
जोकोविच्या या आरोपांवर ऑस्ट्रेलियन बॉर्डर फोर्सनं आत्तापर्यंत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मला आता टेनिसवरच फोकस करायचं आहे, असं जोकोविचनं स्पष्ट केलं. ऑस्ट्रेलियन ओपनला 12 जानेवारीपासून (सोमवार) सुरुवात होत आहे.