Pakistan vs Bangladesh, 2nd ODI: ढाकामध्ये पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या वनडे सामन्यात एक अत्यंत विचित्र आणि वादग्रस्त घटना घडली आहे. पाकिस्तानचा बॅटर सलमान आगा ज्या पद्धतीने रन आऊट झाला, त्यावरून आता क्रिकेट विश्वात मोठी चर्चा सुरू झाली आहे. मैदानावर खिलाडूवृत्ती दाखवण्याच्या नादात आगा सलमानला आपली विकेट गमवावी लागली आणि त्यानंतर त्याचा राग अनावर झालेला पाहायला मिळाला.
असा घडला तो विचित्र प्रकार
डावातील 39 वे ओव्हर सुरू असताना बांगलादेशचा कॅप्टन मेहदी हसन मिराज बॉलिंग करत होता. ओव्हरच्या चौथ्या बॉलवर मोहम्मद रिझवानने समोरच्या दिशेला एक शॉट खेळला आणि बॉल तिथेच थांबला. नॉन-स्ट्रायकर एंडला उभा असलेला आगा सलमान क्रीझच्या थोडे बाहेर आला होता. बॉल थांबलेला पाहून तो पुन्हा मागे फिरला आणि क्रीझमध्ये जाण्याचा प्रयत्न करू लागला. याच गडबडीत तो आणि मेहदी हसन एकमेकांना धडकले.
रन पूर्ण करण्याचा कोणताही हेतू नसल्याने आगा सलमानने तो बॉल उचलून मेहदीच्या हातात देण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो बॉल उचलण्यापूर्वीच मेहदी हसनने चपळाईने बॉल पकडला आणि थेट स्टम्पवर मारला. ज्यावेळी थ्रो स्टम्पला लागला, त्यावेळी आगा सलमान क्रीझच्या बाहेर होता.
( नक्की वाचा : Suryakuamar Yadav :'मी त्याची माफी मागितली'; टी-20 वर्ल्ड कपमधील त्या मोठ्या चुकीवर सूर्याने अखेर सोडलं मौन )
थर्ड अंपायरचा निर्णय आणि सलमानचा संताप
या विचित्र प्रसंगानंतर मैदानी अंपायर तनवीर अहमद यांनी थर्ड अंपायरची मदत घेतली. रिप्लेमध्ये असे दिसले की बॉल अजून डेड झाला नव्हता आणि नियमानुसार मेहदी हसनने केलेला थ्रो वैध होता. त्यामुळे थर्ड अंपायरने सलमान आगाला आऊट घोषित केले.
हा निर्णय पाहून आगा सलमान आगा चांगलाच संतापला. त्याला वाटले होते की मेहदी हसन खिलाडूवृत्ती दाखवून अपील मागे घेईल, पण तसे झाले नाही. आऊट दिल्यानंतर सलमान प्रचंड संतापलेला दिसला. मैदाबाहेर जाताना त्याने रागाच्या भरात आपले हेल्मेट आणि ग्लव्हज फेकून दिले.
सलमानची हाफ सेंच्युरी
विचित्र पद्धतीने आऊट होण्यापूर्वी सलमानने पाकिस्तानसाठी चांगली बॅटिंग केली होती. पाचव्या नंबरवर खेळायला आलेल्या सलमाननं 62 बॉलमध्ये 64 रनची खेळी केली. यामध्ये त्याने 7 चौकार आणि 2 सिक्स मारले. त्याचा स्ट्राईक रेट 103.22 इतका होता. ज्यावेळी तो आऊट झाला, त्यावेळी पाकिस्तानचा स्कोअर 38.4 ओव्हरमध्ये 4 बाद 231 रन असा होता. मात्र त्याच्या या विकेटमुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसला आणि सोशल मीडियावर बांगलादेशच्या कर्णधाराच्या या वागणुकीवर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.