Suryakumar Yadav Admits Mistake: टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या ऐतिहासिक विजयानंतर भारतीय टीमचा कॅप्टन सूर्यकुमार यादव याने एक खळबळजनक खुलासा केला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या महत्त्वाच्या मॅचमध्ये अक्षर पटेलला बाहेर बसवणे ही आपली मोठी चूक होती, अशी कबुली त्याने दिली आहे. विशेष म्हणजे या निर्णयामुळे अक्षर प्रचंड संतापला होता आणि मॅच संपल्यानंतर सूर्याने स्वतः त्याची माफीही मागितली होती.
नेमकं काय घडलं?
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सुपर 8 मॅचमध्ये अक्षर पटेलला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर ठेवण्याचा निर्णय भारताला चांगलाच महागात पडला होता. या स्पर्धेत भारताला स्वीकारावा लागलेला तो एकमेव पराभव ठरला. या निर्णयावर बोलताना सूर्यकुमार म्हणाला की, अक्षर खूप रागावला होता आणि त्याचे रागवणे रास्तच होते.
तो एक अनुभवी प्लेयर आहे आणि आयपीएलमध्ये एका फ्रँचायझीचे नेतृत्व करतो, त्यामुळे त्याला राग येणे स्वाभाविक होते. संघहितासाठी घेतलेला तो एक कठीण निर्णय होता, पण मी माझी चूक मान्य केली आणि दुसऱ्या दिवशी त्याच्याशी सविस्तर बोलून त्याची माफीही मागितली.
( नक्की वाचा : T20 WC 2026: BCCI चा खजिना उघडला! 131 कोटींच्या बक्षीसाची अशी होणार विभागणी; कुणाला किती मिळणार? वाचा सविस्तर )
ऐतिहासिक विजय आणि नवा रेकॉर्ड
अहमदाबादमध्ये झालेल्या फायनलमध्ये भारताने न्यूझीलंडचा 96 रनने धुव्वा उडवत तिसऱ्यांदा टी-20 वर्ल्ड कपवर आपले नाव कोरले आहे. 2007 आणि 2024 नंतर आता 2026 मध्येही चॅम्पियन बनून भारताने सलग दोन वेळा वर्ल्ड कप जिंकण्याचा आणि घरच्या मैदानावर जेतेपद मिळवण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे. न्यूझीलंडने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला, पण भारतीय बॅटर्सनी त्यांचा हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरवला.
अभिषेक शर्मा आणि सॅमसनची वादळी बॅटिंग
भारताची सुरुवात अत्यंत धडाकेबाज झाली. फॉर्मात परतलेल्या अभिषेक शर्माने केवळ 21 बॉल्समध्ये 52 रनची तुफानी खेळी केली, ज्यामध्ये 6 फोर आणि 3 सिक्सचा समावेश होता. त्याने संजू सॅमसनसोबत 98 रनची पार्टनरशिप केली. त्यानंतर सॅमसनने इशान किशनसोबत शतकी भागीदारी करत भारताला 16 ओव्हर्समध्येच 200 रनच्या पार नेले. इशान किशनने 25 बॉल्समध्ये 54 रन कुटले. शेवटच्या ओव्हर्समध्ये शिवम दुबेने फक्त 8 बॉल्समध्ये नाबाद 26 रन चोपल्यामुळे भारताने 255/5 असा वर्ल्ड कप फायनलमधील सर्वोच्च स्कोर उभा केला.
( नक्की वाचा : Sanju Samson चा 'देवमाणूस' सचिन तेंडुलकर! बॅट चालत नव्हती तेव्हा देवानेच दिला आधार; भावूक संजूनं सारं सांगितलं )
अक्षर पटेलसाठी भावूक क्षण
या विजयानंतर अक्षर पटेलने सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. त्याने म्हटले की, वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न प्रत्येक लहान मुल पाहते, पण हा विजय माझ्यासाठी जास्त खास आहे कारण माझा मुलगा हक्ष याने पहिल्यांदाच स्टेडिअममध्ये बसून मला खेळताना पाहिले. न्यूझीलंडच्या 256 रनच्या पाठलागादरम्यान अक्षर आणि बुमराहने त्यांची कंबर तोडली. न्यूझीलंडकडून टिम सायफर्टने 52 आणि मिचेल सँटनरने 43 रन केले, पण संपूर्ण टीम 159 रनवर ऑल आऊट झाली आणि भारताने दिमाखात जेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world