भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावामुळे पाकिस्तान सुपर लीग (Pakistan Super League ) स्पर्धा स्थगित झाली आहे. ही स्पर्धा यूएईमध्ये खेळवण्याची घोषणा पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं केली आहे. पण, इमिरात क्रिकेट बोर्डाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यूएई पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा हा प्रस्ताव नाकारण्याच्या तयारीत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचा मित्र ही प्रतिमा टाळण्याचा युएईचा प्रयत्न आहे. पीएसएलचं आयोजन युएईमध्ये झाले तर पाकिस्तान बोर्डाचा जवळचा सहकारी ही युएईची प्रतिमा आणखी गडद होऊ शकते.
द इमिरात क्रिकेट बोर्ड आणि भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाचे (BCC) संबंध ही अतिशय चांगले आहेत. भारत यजमान असलेल्या T20 वर्ल्ड कप 2021 चे आयोजन हे यूएईमध्ये झाले होते. त्याचबरोबर कोरोना व्हायरसच्या काळात आयपीएल 2020 ही संपूर्ण स्पर्धा तसंच आयपीएल 2021 मधील निम्मे सामने हे युएईमध्ये झाले होते. त्याचबरोबर चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधील भारताचे सामने देखील हे युएईमध्ये खेळवले गेले होते.
( नक्की वाचा : IPL 2025: कधी आणि केंव्हा होणार उर्वरित सामने? वाचा सर्व अपडेट )
दुबई हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलचे (ICC) मुख्यालय आहे. बीसीसीआयचे माजी सचिव जय शाह हे सध्या त्याचे प्रमुख आहेत.
संयुक्त अरब अमिरातीमध्ये दक्षिण आशियाई देशातील नागरिकांची संख्या मोठी आहे. यामध्ये क्रिकेट फॅन्सची संख्या देखील बरीच आहे. सध्याच्या तणावपूर्ण परिस्थितीमध्ये पीएसएलसारख्या स्पर्धेचं आयोजन केलं तर युएईमधील सलोखा बिघडू शकतो, तसंच सुरक्षा धोक्यात येऊन अनावश्यक संघर्ष निर्माण होऊ शकतो, अशी भीती सूत्रांनी व्यक्त केली आहे.
पाकिस्तानच्या विविध भागांमध्ये गुरुवारी (8 मे 2025) ड्रोन हल्ले झाल्याचे वृत्त सोशल मीडियावर चर्चिले जात होते. यामध्ये रावळपिंडीचाही समावेश होता. रावळपिंडीच्या क्रिकेट स्टेडियम परिसरात ड्रोन आदळलं असून याच मैदानात गुरुवारी पाकिस्तान सुपर लीगचा सामना होणार होता. या ड्रोन हल्ल्यामुळे रावळपिंडी स्टेडियम परिसराचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं ही स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला.