Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिकची सुरुवात वादग्रस्त झाली आहे. ऑलिम्पिकचा अधिकृत उद्घाटन कार्यक्रम 26 जुलै रोजी होणार आहे. त्यापूर्वीच काही प्रकारातील सामने सुरु झाले आहेत. फुटबॉलमधील B ग्रुपमध्ये वर्ल्ड चॅम्पियन अर्जेंटिना विरुद्ध मोरक्को (Argentina vs Morocco) हा सामना चांगलाच वादग्रस्त ठरला. या सामन्यात मॅच संपल्यानंतर तब्बल 2 तासांनी अर्जेंटिनाला पराभूत म्हणून घोषित करण्यात आलं. फुटबॉल सामन्याचा निकाल खेळ संपल्यानंतर दोन तासांनी लागण्याची ही पहिलीच घटना असावी.
('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नेमकं काय घडलं?
वर्ल्ड चॅम्पियन अर्जेंटिनाचे लिओनेल मेस्सीसह अनेक प्रमुख खेळाडू ऑलिम्पिकमध्ये खेळत नाहीयत. त्यानंतरही अर्जेंटिनाचं पारडं जड होतं. पण, मोरक्कोच्या रहिमी सुफियान यानं 45 आणि 49 व्या मिनिटाला गोल करत टीमला 2-0 अशी सनसनाटी आघाडी मिळवून दिली.
अर्जेंटिनाकडून सायमन ज्युलिआनेनं 68 व्या मिनिटाला गोल करत मोरक्कोची आघाडी कमी केली. निर्धारित वेळ संपल्यानंतर तब्बल 16 मिनिटांचा अतिरिक्त वेळ देण्यात आला होता. त्यावेळी अगदी शेवटच्या क्षणी मेदिना क्रिस्टियन यानं गोल करत अर्जेंटिनाला 2-2 अशी बरोबरी मिळवून दिली. त्यानंतर गोंधळ सुरु झाला.
( नक्की वाचा : फायनल मॅचमध्ये लहान मुलासारखा रडला Messi, भर मैदानात घडला धक्कादायक प्रकार, Video )
मेदिनानं केलेले गोल ऑफ साईड होता, असं मोरोक्कोच्या फॅन्संच मत होतं. त्यांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त करत गोंधळ सुरु केला. काही प्रेक्षक मैदानात घुसले.काही जणांनी खेळाडूंच्या दिशेनं बाटल्या फेकून राग व्यक्त केला. या गोंधळात मॅच थांबवण्यात आली.खेळाडूंना संतप्त प्रेक्षकांपासून वाचवण्यासाठी पोलिसांना बरीच कसरत करावी लागली. त्यांना मोठ्या सुरक्षेत मैदानातून बाहेर काढण्यात आलं. ऑलिम्पिकच्या अधिकृत वेबसाईटवरही निकाल 2-2 असा बरोबरीत सुटल्याचं जाहीर करण्यात आलं. त्यामुळे अनेक फुटबॉल फॅन्सची मॅच संपल्याची समजूत झाली आणि ते घरी निघून गेले.
तब्बल 2 तासांनी सर्व प्रेक्षक मैदानातून निघून गेल्यानंतर रिकाम्या स्टेडियममध्ये उरलेले 3 मिनिटं 15 सेकंद सामना खेळवण्यात आला. व्हिडिओ असिस्टंट रेफ्री (VAR) यांनी मेदिनाच्या गोलाची तपासणी केली. त्यानंतर त्यांनी हा गोल ऑफ साईड असल्याचं जाहीर करत रद्द केला. या पद्धतीनं तब्बल 2 तासांनी मोरक्कोला विजयी घोषित करण्यात आलं.