Paris Olympics, 1 Medal hope for India : पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेचं भव्य उद्घाटन झाल्यानंतर आता सर्व खेळांना सुरुवात झाली आहे. या ऑलिम्पिक स्पर्धेत 117 खेळाडू वेगवेगळ्या खेळांमध्ये पदाकांची दावेदारी सादर करण्यासाठी दाखल झाले आहेत. त्यामध्ये तब्बल 21 नेमबाजांचा समावेश आहे. त्यामुळे यंदा नेमबाजांकडून देशाला मोठी अपेक्षा आहे. नेमबाजीमध्ये भारतासाठी पहिला दिवस संमिश्र ठरला. सरबजोत सिंह, अर्जुन सिंह चिमा यांना 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश करण्यात अपयश आलं. तर याच प्रकारच्या महिलांच्या स्पर्धेत (10m Air Pistol Women's Qualification Results) मनू भाकरनं (Manu Bhaker) तिसऱ्या क्रमांकासह फायनलमध्ये प्रवेश केला आहे.
('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
20 वर्षांनी बरोबरी
मनू भाकरनं 580 पॉईंट्स मिळवत तिसऱ्या क्रमांकासह स्पर्धेच्या फायनल राऊंडमध्ये प्रवेश केलाय. मनू भाकर गेल्या 20 वर्षांमध्ये व्यक्तिगत स्पर्धेत ऑलिम्पिंकच्या फायनलमध्ये पोहचलेली पहिली भारतीय महिला नेमबाज आहे. यापूर्वी सूमा शिरुरनं 2004 साली अथेन्समध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत 10 मीटर एअर रायफल स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला होता.
मनू भाकर सध्या चांगल्या फॉर्मात आहे. पहिल्या दिवशी अन्य भारतीय नेमबाजांनी अपेक्षाभंग केला. पण, मनू भाकरनं तिच्या लौकिकाला साजेसा खेळ केला. तिनं 10 पॉईंट्सच्या इनर सर्कलमध्ये 27 वेळा नेम (Bull's Eye) साधत फायनलमध्ये तिसऱ्या क्रमांकासह मोठ्या दिमाखात प्रवेश केला. रविवारी या गटातील टॉप 8 स्पर्धक फायनलमध्ये खेळतील. पात्रता फेरीतील खेळाची पुनरावृत्ती मनूनं या राऊंडमध्येही केली तर ती भारताला नक्की पदक मिळवू शकेल.
( नक्की वाचा : Paris Olympics जीव वाचवण्यासाठी पळाले अर्जेंटिनाचे खेळाडू, मॅच संपल्यानंतर 2 तासांनी झाला पराभव )
या गटातील दुसरी भारतीय खेळाडू रिदम सांगवानला अंतिम फेरी गाठण्यात अपयश आलं. तिला 15 व्या क्रमांकावर समाधान मानवं लागलं. या कामगिरीनंतर रिदम या गटातून पदकांच्या शर्यतीमधून बाहेर झाली आहे.
यापूर्वी 10 मीटर रायफलच्या मिक्स इव्हेंटमध्ये रमिता जिंदल आणि अर्जून बबूता यांचं आव्हान देखील प्राथमिक फेरीत संपुष्टात आलं. तर एलावेनिल वलारिवन-संदीप सिंह ही जोडी 12 वा क्रमांक मिळवून स्पर्धेतून बाहेर पडली. 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेच्या पुरुषांच्या गटामध्ये सरबजोत सिंहनं फायनल गाठण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. पण, त्याला फक्त 1 पॉईंट कमी पडला.