RCB vs SRH IPL 2026 Prediction: क्रिकेट फॅन्सना गेल्या काही दिवसांपासून ज्याची उत्सुकता होती तो आयपीएल 2026 चा सिझन आता थोड्याच वेळात सुरु होत आहे. पहिल्याच सामन्यात क्रिकेट फॅन्सना हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळणार आहे. गतविजेती रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूची (RCB) टीम आपल्या घरच्या मैदानावर म्हणजेच चिन्नास्वामी स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद (SRH) विरुद्ध भिडणार आहे.
गेल्या सिझनमध्ये आरसीबीने ऐतिहासिक विजेतेपद पटकावल्यानंतर आता त्यांच्यासमोर जेतेपद टिकवण्याचे मोठे आव्हान असेल, तर दुसरीकडे हैदराबादचा संघ नव्या रणनीतीसह मैदानात उतरण्यास सज्ज झाला आहे.
RCB ची सर्वात मोठी डोकेदुखी काय?
विजेतेपद राखण्याच्या निर्धाराने मैदानात उतरणाऱ्या आरसीबीला सामन्यापूर्वीच मोठा धक्का बसला आहे. टीमचा मुख्य फास्ट बॉलर यश दयाल वैयक्तिक कारणांमुळे उपलब्ध नाही. तर, ऑस्ट्रेलियाचा स्टार बॉलर जॉश हेझलवूडला अद्याप क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून ना हरकत प्रमाणपत्र (NOC) मिळालेले नाही.
या परिस्थितीत आरसीबीची भिस्त अनुभवी भुवनेश्वर कुमारवर असेल, जो आपल्या जुन्या टीमविरुद्ध आरसीबीच्या बॉलिंगचं नेतृत्त्व करेल. रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील या टीममध्ये विराट कोहली आणि फिल सॉल्ट ही अनुभवी आणि स्फोटक जोडी आरसीबीची इनिंग सुरु करेल.
( नक्की वाचा : Shane Warne: शेन वॉर्न निघाला खरा 'धुरंधर'; 18 वर्षांपूर्वीच्या एका अटीमुळे कुटुंबावर 460 कोटींचा धनवर्षाव )
हैदराबादला पॅट कमिन्सची उणीव भासणार
सनरायझर्स हैदराबादसमोर कर्णधारपदाचे मोठे पेचप्रसंग उभे ठाकले आहेत. नियमित कर्णधार पॅट कमिन्स पाठीच्या दुखापतीमुळे सुरुवातीच्या 5 ते 6 सामन्यांना खेळणार नाही. त्याच्या अनुपस्थितीत स्टार खेळाडू इशान किशनकडे हंगामी कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. हैदराबादसाठी जमेची बाजू म्हणजे श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज एशान मलिंगा निवडीसाठी उपलब्ध आहे. ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा आणि हेनरिक क्लासेन यांच्यासारख्या तगड्या बॅटरमुळे हैदराबादची बॅटिंग लाईनअप स्फोटक आहे.
चिन्नास्वामीवरील इतिहास आणि आकडेवारी
बेंगळुरूचे एम. चिन्नास्वामी स्टेडियम हे नेहमीच रन्सचा पाऊस पाडणारे मैदान ठरले आहे. 2024 मध्ये याच मैदानावर हैदराबादने 287 धावांचा डोंगर उभा केला होता, ज्याची आठवण आजही चाहत्यांच्या मनात ताजी आहे.
या मैदानावर दोन्ही टीममध्ये आतापर्यंत 8 सामने झाले असून त्यापैकी आरसीबीने 5 तर हैदराबादने 3 सामने जिंकले आहेत. घरच्या मैदानाचा फायदा आरसीबीला मिळतो की हैदराबाद पुन्हा एकदा रन्सचा पाऊस पाडते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
( नक्की वाचा : Yograj Singh :'दाढी कापून फेकेन, पण त्याला नंबर 1 बनवेन'; अर्जुन तेंडुलकरवरून योगराज सिंग यांनी अश्विनला झापलं )
आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB): विराट कोहली, फिल सॉल्ट, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कॅप्टन), जितेश शर्मा (विकेट किपर), टिम डेव्हिड/जेकब बेथेल, रोमॅरियो शेफर्ड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जेकब डफी, सुयश शर्मा.
सनरायझर्स हैदराबाद (SRH): ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, इशान किशन (कॅप्टन आणि विकेट किपर), हेनरिक क्लासेन, नितीश कुमार रेड्डी, लियम लिव्हिंगस्टोन, अनिकेत वर्मा, हर्ष दुबे, हर्षल पटेल, एशान मलिंगा, जयदेव उनाडकट.
कुणाचे पारडे जड?
चिन्नास्वामी स्टेडियमवर टॉसची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. जर हैदराबादचा संघ दुसऱ्यांदा बॅटिंगसाठी उतरला, तर त्यांच्याकडे विजयाची मोठी संधी आहे. मात्र, आरसीबीकडे विराट कोहलीसारखा रन मशीन असल्याने ते कोणत्याही लक्ष्याचा पाठलाग सहज करू शकतात. आरसीबीकडं भुवनेश्वर कुमार हा अनुभवी बॉलर आहे. तर हैदराबादच्या बॉलर्सना आरसीबीला रोखण्यासाठी कामगिरी कमालीचा उंचवावी लागेल. दोन्ही टीमचा तुलनात्मक अभ्यास केला तर आरसीबीचं पारडं जड आहे.