Rishabh Pant Resigns as LSG Captain: आयपीएल 2026 च्या मैदानात लखनौ सुपर जायंट्सचा (LSG) प्रवास संपुष्टात आला असला तरी खऱ्या अर्थानं वादळ सुरु झालं आहे. लखनौचा कॅप्टन ऋषभ पंतनं कॅप्टनसी सोडण्याची घोषणा केली आहे. लखनौच्या फ्लॉप शोची जबाबदारी स्वीकारत पंतनं कॅप्टनशीप सोडण्याचा निर्णय घेतला आणि फ्रेंचायझीनं तो तातडीनं मान्यही केला. पण या राजीनाम्यामागे केवळ पराभव आहे की आणखी काही? याची चर्चा आता क्रिकेट वर्तुळात रंगली आहे.
पंतनं कॅप्टनशीप का सोडली?
ऋषभ पंतनं स्वतःहून हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात असलं तरी त्यामागे काही ठोस कारणं दिसत आहेत. या सीझनमध्ये लखनौला 14 पैकी केवळ 4 मॅच जिंकता आल्या, तर 10 मॅचमध्ये पराभवाची नामुश्की सहन करावी लागली. लखनौची टीम पॉईंट्स टेबलमध्ये सर्वात तळाला म्हणजेच 10 व्या क्रमांकावर फेकली गेली. प्ले-ऑफच्या रेस मधून बाहेर पडणारी ती पहिली टीम ठरली. या सातत्यपूर्ण खराब कामगिरीमुळे पंतवर प्रचंड दबाव होता.
( नक्की वाचा : एका फोन कॉलने लग्न लांबवलं आणि रचला इतिहास! कोण आहे हा खेळाडू ज्याने RCB ला पहिल्यांदा चॅम्पियन बनवलं )
बॅटिंगवर होतोय कॅप्टनशीपचा परिणाम?
लखनौचे क्रिकेट संचालक टॉम मूडी यांनी या बदलाचे संकेत आधीच दिले होते. त्यांच्या मते, कॅप्टनशीपच्या दबावाचा परिणाम ऋषभच्या बॅटिंगवर होत आहे. 2025 मध्ये पंतनं केवळ 269 रन केले होते, तर 2026 मध्ये त्याला केवळ 312 रनच बनवता आले. ज्या धडाकेबाज खेळीसाठी ऋषभ ओळखला जातो, ती चमक या दोन वर्षात गायब होती. स्वतःच्या खेळावर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्यानं हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे.
27 कोटींचा जुगार फसला?
लिलावामध्ये लखनऊने ऋषभ पंतला तब्बल 27 कोटी रुपये देऊन आपल्या ताफ्यात घेतलं होतं. केएल राहुल नंतर तो टीमचा दुसरा कॅप्टन बनला. त्यानं टीमला 200 टक्के योगदान देण्याचं प्रॉमिस केलं होतं, पण आकडेवारी काही वेगळंच सांगते. पंतच्या नेतृत्वाखाली टीमनं केवळ 10 मॅच जिंकल्या, तर 18 मॅचमध्ये त्यांना हार पत्करावी लागली. हा फ्लॉप शो टीम मालकांच्या पचनी पडणारा नव्हता.
आता पुढे काय होणार?
पंत आता केवळ बॅटर म्हणून टीममध्ये राहणार की लखनौनं त्याची साथ सोडली आहे, हे अजून स्पष्ट झालेलं नाही. मात्र, टीममध्ये आता मोठ्या बदलांची तयारी सुरू झाली आहे. टॉम मूडी यांच्या मते, टीमची पुनर्बांधणी करण्यासाठी हे पाऊल उचलणं गरजेचं होतं. आता लखनौकडे निकोलस पूरन, मिचेल मार्श आणि एडन मार्करम यांसारखे पर्याय आहेत, जे कॅप्टनशीपची धुरा सांभाळू शकतात.