Rishabh Pant Century: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा विकेटकीपर आणि स्फोटक फलंदाज रिषभ पंत याने शतक ठोकले आहे. शिक्स मारत त्याने आपली सेंच्युरी पूर्ण केली. IPL 2025 मध्ये समाधानकारक कामगिरी न केलेल्या रिषभ पंतची इंग्लंड दौऱ्यासाठी निवड करण्यात आली तेव्हा अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. लीडस टेस्टच्या दुसऱ्या दिवशी पंतने झंझावाती शतक झळकावत टीकाकारांची तोंडे बंद केली. 10 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने त्याने शतक झळकावले. हे शतक झळकावताच रिषभ पंत याने धोनीचा रेकॉर्डही मोडला.
(नक्की वाचा: यशस्वी जैस्वालनं इतिहास घडवला)
रिषभ पंत याने 146 चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले. 44 कसोटी सामने खेळलेल्या रिषभ पंत याचे हे 7 वे शतक आहे. रिषभ पंत शतकाच्या उंबरठ्यावर असताना ऑफ स्पिनर शोएब बशीर गोलंदाजी करत होता. एका हाताने त्याला सिक्स मारत रिषभने शतक झळकावले.
धोनीचा रेकॉर्ड मोडला (Rishabh Pant Breaks MS Dhoni record)
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने भारतासाठी 90 कसोटी सामने खेळले होते. यात त्याने 6 शतके ठोकली होती. यातले एकही शतक आशिया खंडाबाहेरील देशात नव्हते. दुसरीकडे रिषभ पंत याने 7 शतके ठोकली असून त्याने कसोटी क्रिकेटमध्ये भारताचा यष्टीरक्षक म्हणून सर्वाधिक शतके झळकावण्याचा मान मिळवला आहे. (How many centuries has Rishabh Pant scored?) रिषभ पंत याने इंग्लंडमध्ये 3 शतके झळकावली आहेत तर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेत प्रत्येकी एक शतक केले आहे.
- इंग्लंडमध्ये एकाही पाहुण्या संघाच्या विकेटकीपरने एकापेक्षा अधिक शतके केलेली नाहीत
- रिषभ पंत याने 8 वेळा 90ते 99 च्या दरम्यान धावा केल्या आहेत
- गेल्या वर्षी रिषभ न्यूझीलंडविरूद्ध खेळताना 99 धावांवर बाद झाला होता
- ऑस्ट्रेलिया दौऱ्यात रिषभची कामगिरी तितकीशी समाधानकारक नव्हती
- भारताचा नियमित उपकर्णधार म्हणून रिषभचा हा पहिलाच सामना आहे
रिषभ पंतकडे नवे विक्रम करण्याची सुवर्णसंधी
विकेटकीपर फलंदाज म्हणून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या अॅडम गिलख्रिस्टच्या नावावर आहे, त्याने 17 शतके झळकावली आहे. झिम्बाब्वेचा अँडी फ्लॉवर याने कसोटी सामन्यांत 12 शतके केली होती आणि तो या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. 1929 ते 1939 दरम्यान इंग्लंडकडून खेळणाऱ्या लेस एम्स याने 8 शतके झळकावली होती. एबी डिव्हिलियर्स (दक्षिण आफ्रिका), मॅट प्रायर (इंग्लंड), कुमार संगकारा (श्रीलंका) आणि बीजे वॉटलिंग (न्यूझीलंड) यांनी प्रत्येकी 7 शतके झळकावली असून रिषभ पंत त्यांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे.