टीम इंडियाच्या टेस्ट आणि वन-डे टीमचा कॅप्टन रोहित शर्मानं (Rohit Sharma) इतक्यात निवृत्ती घेणार नसल्याचं सांगून फक्त एकच दिवस उलटला आहे. टीम इंडियानं टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर रोहितनं आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तो टेस्ट आणि वन-डे क्रिकेटमधून कधी निवृत्त होणार याची चर्चा सुरु असते. स्वत: रोहितनं याबाबत कोणतेही संकेत दिलेले नाहीत. पण, रोहित शर्माचे लहाणपणीचे कोच दिनेश लाड यांनी त्याच्या निवृत्तीबाबत एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
रोहित कधी रिटायर होणार?
सध्या सुरु असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशिप स्पर्धेतनंतर (World Test Championship 2023-2025) रोहित टेस्ट क्रिकेटमधून निवृत्त होऊ शकतो, कारण त्याचं वय वाढत आहे, असं वक्तव्य लाड यांनी दैनिक जागरणशी बोलताना केलं आहे.
'रोहित वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेनंतर लगेच निवृत्तीची घोषणा करेल, असं मी म्हणत नाहीय. पण, त्याचं वय वाढत आहे. त्यामुळे तो टेस्ट क्रिकेटमधून निवृत्त होऊ शकतो,' असं रोहितच्या माजी प्रशिक्षकांनी स्पष्ट केलं.
अर्थात 2027 साली होणाऱ्या वन-डे वर्ल्ड कपपर्यंत रोहित शर्मा वन-डे क्रिकेट खेळेल यामध्ये लाड यांच्या मनात कोणतीही शंका नाही. गेल्या वर्षी झालेल्या वन-डे वर्ल्ड कपमध्ये भारतीय क्रिकेट टीमकडून विजेतेपदाची मोठी अपेक्षा होती. पण, टीम इंडियाचा फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला. वन-डे वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न रोहित शर्मा 2027 साली पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल, असं लाड यांनी सांगितलं.
( नक्की वाचा : ऋषभ पंतच्या स्मार्टनेसमुळे जिंकला T20 वर्ल्ड कप! रोहित शर्मानं 3 महिन्यांनी उघड केलं रहस्य, Video )
रोहितनं काय सांगितलं?
कपिल शर्माच्या 'कॉमेडी शो' कार्यक्रमात रोहित नुकताच सहभागी झाला होता. त्यावेळी त्यानं आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमधून निवृत्त होण्याचं कारण सांगितलं होतं. क्रिकेटमधील सर्वात लहान प्रकारात तरुण खेळाडूंना संधी मिळावी यासाठी आपण निवृत्तीचा निर्णय घेतल्याचं रोहितनं सांगितलं.
'मला या प्रकारात (T20I) खूप आनंद मिळाला. मी 17 वर्ष हे क्रिकेट खेळलो. आम्ही वर्ल्ड कप जिंकला. तो थांबण्याचा आणि इतर गोष्टी करण्यासाठी पुढं जाण्याचा सर्वोत्तम क्षण होता,' असं रोहितनं यावेळी बोलताना स्पष्ट केलं.
'टीम इंडियाकडून चांगली कामगिरी करु शकतील असे अनेक गुणवान खेळाडू आहेत. ही योग्य वेळ असल्याचं मला वाटलं. मी अजूनही भारतासाठी तीन्ही प्रकारातील क्रिकेट सहज खेळू शकतो. फिटनेस हा तुमच्या मनात असतो, असं मी नेहमी सांगतो. माझा स्वत:वर विश्वास आहे. मी माझं मन नियंत्रणात ठेवू शकतो. काही वेळा ते सोपं नसतं. पण, अनेकदा मला ते जमतं' असं रोहितनं स्पष्ट केलं.