Rohit Sharma Gifted His Iconic Lamborghini Urus : मुंबई इंडियन्सचा अनुभवी बॅटर रोहित शर्मानं त्याच्या एका फॅनला आयुष्यभर लक्षात राहील अशी भेट दिली आहे. रोहितनं त्याची प्रसिद्ध निळ्या रंगाची लॅम्बोर्गिनी कार भेट म्हणून दिली आहे. ही कार रोहित शर्माची बऱ्याच दिवसांपासून ओळख होती. या कारचा नंबर प्लेट हा 264 होता. रोहितनं वन-डे क्रिकेटमध्ये 264 रन्सची ऐतिहासिक इनिंग खेळली होती. त्याची आठवण म्हणून या कारचा नंबर 264 होता.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
रोहितच्या या शानदार लक्झरी कारची भारतातील किंमत सुमारे 4 कोटी रुपये आहे. रोहितनं ही खास भेट एका फँटसी क्रिकेट स्पर्धेच्या विजेत्याला मिळाली, ज्याची घोषणा रोहितने काही काळापूर्वी एका Dream11 जाहिरातीत विनोदी पद्धतीने केली होती.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये रोहित आपल्या चाहत्याला कारची चावी सोपवताना दिसत आहे. पार्श्वभूमीत ती शानदार SUV देखील दिसत आहे.
यापूर्वी रोहित शर्माने नुकतीच टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यानं 67 टेस्टमध्ये 12 सेंच्युरी आणि 18 हाफ सेंच्युरींच्या मदतीनं 4,301 रन्स केले. रोहित प्रमाणेच विराट कोहलीनेही भारत आणि इंग्लंड यांच्यातील आगामी टेस्ट सीरिजपूर्वी या प्रकारातून रिटायमेंटची घोषणा केली आहे.
मुंबई इंडियन्सचं आव्हान कायम
रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सचं (Mumbai Indians) आयपीएल 2025 मधील आव्हान अद्याप कायम आहे. मुंबई इंडियन्सनं आत्तापर्यंत 12 पैकी 7 मॅच जिंकले असून त्यांचे 14 पॉईंट्स आहेत. मुंबई इंडियन्सची पुढील लढत दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणार आहे. दिल्लीनं 12 मॅचमध्ये 6 विजयासह 12 पॉईंट्स मिळवलेत. त्यामुळे 'प्ले ऑफ' साठी दोन्ही टीममधील लढत ही निर्णायक ठरु शकते.
( नक्की वाचा : LSG vs SRH: 'आम्ही ज्या पद्धतीनं लिलाव...' लखनौचं आव्हान संपुष्टात आल्यानंतर ऋषभ पंतचं मोठं वक्तव्य )
गुजरात टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स यांनी आधीच प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. आता फक्त एक जागा शिल्लक आहे. त्या जागेसाठी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये स्पर्धा आहे.