IPL 2026, MI vs GT :आयपीएल 2026 मधील सोमवारी (20 एप्रिल 2026) झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सचा 99 रनने मोठा पराभव केला. या विजयामुळे मुंबईच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण असले तरी, मैदानावरील एका वेगळ्याच घटनेची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पंड्या असला तरी, ऐन सामन्यात रोहित शर्माने केलेली फिल्डवरील एन्ट्री आणि त्याने ठरवलेली रणनीती मुंबईच्या विजयात टर्निंग पॉईंट ठरली आहे. रोहितच्या या 'मास्टरप्लॅन'मुळेच गुजरातचा डाव गडगडल्याचे बोलले जात आहे.
या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सने प्रथम बॅटिंग करताना 20 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून 199 रनचा डोंगर उभा केला. मुंबईच्या या डावाचा खरा हिरो ठरला तो म्हणजे तिलक वर्मा. टिळकने अवघ्या 45 बॉलमध्ये नाबाद 101 रनची झंझावाती खेळी केली.
या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातचा संघ पूर्णपणे ढेपाळला. अश्वनी कुमारने गुजरातचे 4 बॅटर बाद केले. अश्वनीच्या या स्पेलमुळे गुजरातचा संपूर्ण संघ 15.5 ओव्हरमध्ये अवघ्या 100 रनवर ऑल आऊट झाला.
मॅचमध्ये नसूनही रोहित सक्रीय
रोहित शर्मा दुखापतीमुळे या सामन्यात प्लेइंग 11 चा भाग नव्हता, मात्र त्याचे लक्ष पूर्णपणे सामन्यावर होते. गुजरातची बॅटिंग सुरू असताना ब्रेक दरम्यान रोहित शर्मा अचानक मैदानात आला. यावेळी त्याने व्हाईस कॅप्टन सूर्यकुमार यादव याच्याशी बराच वेळ चर्चा केली आणि त्याला काही खास टिप्स दिल्या.
रोहित आणि सूर्या यांच्यातील संवादाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. चाहत्यांच्या अंदाजानुसार, हार्दिक पंड्या मैदानावर असला तरी विजयाची खरी सूत्रे रोहित शर्माच्या हातात होती आणि त्याच्याच नियोजनामुळे मुंबईने हा सामना खिशात घातला.
तिलक वर्माच्या खेळीने रोहित भारावला
डगआऊटमध्ये बसलेला रोहित शर्मा सुरुवातीला काहीसा चिंतेत दिसत होता, मात्र तिलक वर्माच्या फटकेबाजीने त्याच्या चेहऱ्यावर हसू उमलले. तिलक जेव्हा शतक झळकावून डगआऊटमध्ये परतला, तेव्हा रोहितने स्वतः पुढे येऊन त्याची पाठ थोपटली आणि त्याला शाबासकी दिली.
रोहितकडून मिळालेली ही दाद पाहून तिलक वर्माही भावूक झाला होता. सीनियर आणि ज्युनियर खेळाडूतील हा मेळ मुंबई इंडियन्ससाठी सकारात्मक संकेत मानला जात आहे.