Rohit Sharma's Diet Plan: टीम इंडियाच्या वन-डे टीमचा कॅप्टन रोहित शर्मा सध्या त्याच्या क्रिकेटमुळे नाही, तर त्याच्या अविश्वसनीय फिटनेसमुळे चर्चेत आहे. त्याने स्वत:चे वजन जवळपास 20 किलोने कमी केले असून, बीसीसीआयने नव्याने सुरू केलेला 'ब्रॉन्को टेस्ट' सुद्धा सहज पार केली आहे. रोहित ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी वन-डे सीरिजसाठी सज्ज झालाय. 38 वर्षांच्या रोहितचं हे कमबॅक खूप खास मानलं जात आहे.
‘हिटमॅन'चा शानदार कमबॅक
यावर्षी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर रोहित आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर होता. या काळात त्याने स्वत:चा फिटनेस सुधारण्यावर विशेष लक्ष दिले. या कठोर परिश्रमाचे फळ रोहितला मिळाले आहे. रोहितनं बंगळुरू येथील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये 'ब्रॉन्को टेस्ट' दिली. या स्टॅमिना टेस्टमध्ये 1,200 मीटरची शटल रन असते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रोहितने ही चाचणी 5 मिनिटांपेक्षा कमी वेळेत पूर्ण करून बेंचमार्क सहज पार केला.
बीसीसीआयने अधिकृत आकडेवारी जाहीर केलेली नसली तरी, कोचिंग स्टाफ त्याच्या सुधारित स्टॅमिनाने खूप प्रभावित झाल्याचे वृत्त आहे.
( नक्की वाचा : MS Dhoni : 'कॅप्टन कूल' धोनीनं भर मैदानात मला शिव्या दिल्या...,' CSK च्या माजी खेळाडूनं सांगितली Untold Story )
20 किलो वजन कमी केले
रोहितचे वजन सुमारे 95 किलोवरून काही महिन्यांतच 75 किलोपर्यंत खाली आले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्याच्या 'आधी आणि नंतर'च्या फोटोंमध्ये आणि व्हिडिओमध्ये तो पूर्वीपेक्षा खूपच तंदुरुस्त आणि स्लिम दिसत आहे. त्याच्या या ट्रान्सफॉर्मेशनने चाहत्यांनाही आश्चर्यचकित केले.
आहार आणि वर्कआउट
या मोठ्या बदलासाठी रोहितने कार्डिओ आणि स्टॅमिना वर्कआउट्ससोबतच आपल्या आहारातही मोठा बदल केला. फिटनेस तज्ज्ञांच्या आणि त्याचा जवळचा मित्र अभिषेक नायरच्या मार्गदर्शनाखाली त्याने हा बदल घडवून आणला. नेहमीच खाण्याचा शौकीन असलेल्या रोहितने आपल्या लाडक्या डाळ-भात, वडापाव, बटर चिकन आणि बिर्याणी यांसारख्या पदार्थांवर नियंत्रण ठेवले. फिटनेसचे ध्येय गाठण्यासाठी त्याने कार्बोहायड्रेट्स, तळलेले पदार्थ आणि जास्त कॅलरी असलेले पदार्थ टाळले.
रोहितच्या या फिटनेस प्रवासात त्याने कोणता आहार घेतला, याचा एक कथित डाएट चार्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अधिकृतपणे याची पुष्टी झालेली नसली तरी, त्याने केलेल्या कठोर डाएट रुटीनची यातून कल्पना येते.
( नक्की वाचा : Irfan Pathan : 'मी हुक्का लावणारा नाही...': इरफान पठाणचा MS Dhoni वर गंभीर आरोप; जुने वक्तव्य Viral )
या चार्टनुसार रोहित शर्माचा डाएट असा होता
7:00 am: 6 भिजवलेले बदाम, मोड आलेल्या धान्यांचे सॅलड, ताजे फळांचे ज्यूस
9:30 am : (न्याहारी): फळे टाकलेले ओटमील, एक ग्लास दूध
11:30 am: दही, चिला, नारळाचे पाणी
1:30 pm: (दुपारचे जेवण): भाजीची करी, डाळ, भात, सॅलड
4:30 pm: फ्रूट स्मूदी, सुकामेवा
7:30 pm : (रात्रीचे जेवण): पनीर आणि भाज्या, पुलाव, व्हेजिटेबल सूप
9:30 pm: एक ग्लास दूध, मिक्स नट्स
आता, फिटनेस पुन्हा रुळावर आल्यामुळे रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन-डे सीरिजसाठी पूर्णपणे तयार आहे. 2023 साली वन-डे वर्ल्ड कप जिंकण्याचं रोहितचं स्वप्न थोडक्यात हुकलं होतं. आता 2027 साली दक्षिण आफ्रिकेत होणारी ही स्पर्धा जिंकणे रोहितचे ध्येय आहे. ते ध्येय गाठण्यासाठी रोहित आत्तापासूनच झपाटून कामाला लागला आहे, असं मानलं जात आहे.