SA vs AFG T20 World Cup 2026: दक्षिण आफ्रिकेनं अहमदाबादमध्ये झालेल्या अतिशय रंगतदार मॅचमध्ये अफगाणिस्तानचा पराभव केला. या पराभवासह अफगाणिस्तानचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं. तर दक्षिण आफ्रिकेनं न्यूझीलंडसह ग्रुप D मधून सुपर 8 मध्ये प्रवेश केला. अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील मॅच भलतीच रंगतदार झाली.
अफगाणिस्ताननं स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी निकारानं प्रयत्न केले. दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये 4 बॉलमध्ये 24 रन्स हवे होते. त्यावेळी गुरबाझनं सलग तीन सिक्स खेचले. त्याचा तडाखा पाहता अफगाणिस्तान चमत्कार करणार अशीच आशा सर्वांच्या मनात निर्माण झाली होती. पण, केशव महाराजनं अखेर त्याला आऊट केल. दक्षिण आफ्रिकेनं अफगाणिस्तानचा 4 रन्सनं पराभव केला.
या मॅचमध्ये निर्धारित 20 ओव्हर्समध्ये दोन्ही टीम्सनं 187 रन्स केले. त्यामुळे मॅच टाय झाली. त्यानंतर सुपर ओव्हरमध्येही दोन्ही टीम्सनं 17 रन्स केले. त्यामुळे सुपर ओव्हरही टाय झाली. अखेर दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये या मॅचचा निकाल लागला.
दुसऱ्या सुपर ओव्हर्समध्ये दक्षिण आफ्रिकेनं पहिल्यांदा बॅटिंग करत 23 रन्स केले. सध्या फॉर्मात नसलेल्या डेव्हिड मिलरनं निर्णायक क्षणी फटकेबाजी करत 4 बॉलमध्ये 16 रन काढले. अफगाणिस्तानला 24 रन्सचा निकारानं प्रतिकार केला. पण, त्यांना अखेर 4 रन कमी पडले.
( नक्की वाचा : Smriti Mandhana आणि Palash Muchhal चं लग्न का मोडलं? अभिनेत्यानं सांगितलं सांगलीमध्ये 'त्या' दिवशी काय घडलं? )
कसा झाला सामना?
यापूर्वी दक्षिण आफ्रिकेकडून रायन रिकेल्टननं 61 आणि क्विंटन डीकॉकनं 59 रन्स केले. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 114 रन्सची भागिदारी केली. अफगाणिस्तानकडून अजमतउल्लाह ओमरजईनं 41 बॉल मध्ये तीन आणि कॅप्टन राशिद खाननं 28 रन देत दोन विकेट्स घेतल्या. अफगाणिस्ताननं टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला होता.
अफगाणिस्तानला दोन चुका भोवल्या
अफगाणिस्ताननं या मॅचमध्ये शेवटपर्यंत निकारानं प्रतिकार केला. पण, निर्णायक क्षणी त्यांनी दोन चुका केल्या. विसाव्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर एक रन काढताना फजल फारुखी अपयशी ठरला. तो रन आऊट झाला. त्यामुळे मॅच टाय झाली.
त्यानंतर दक्षिण आफ्रिकेला पहिल्या सुपर ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर विजयासाठी 7 रन्स हवे होते. त्यावेळी फारुखीला अचूक बॉल टाकता आला नाही. स्टब्सनं सिक्सर लगावत सामना टाय केला.
T20 वर्ल्ड कपमध्ये ग्रुप D हा 'ग्रुप ऑफ डेथ'मानला जात होता. त्यामध्ये न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान या तीन टीमचा समावेश होता. गेल्या काही आयसीसी स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या अफगाणिस्तानला यंदा कामगिरी उंचावता आली नाही. आधी न्यूझीलंड आणि नंतर दक्षिण आफ्रिकेनं त्यांचा पराभव केला. या पराभवाममुळे अफगाणिस्तानचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं.