आयपीएल 2025 साठी मेगा ऑक्शन नुकतंच पार पडलं. सौदी अरेबियात झालेल्या या मेगा ऑक्शनमध्ये दक्षिण आफ्रिकेचा फास्ट बॉलर मार्को यान्सनला (Marco Jansen) खरेदी करण्यासाठी चांगलीच चढाओढ लागली होती. गेल्या काही महिन्यांपासून फॉर्मात असलेल्या यान्सनला त्याच्या बेस प्राईजच्या साडेपाच पट (7 कोटी रुपये) मोजून पंजाब किंग्जनं (Punjab Kings) खरेदी केलं. ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन रिकी पॉन्टिंग पंजाबचा हेड कोच झाला आहे. पॉन्टिंगच्या नव्या टीमनं दाखवलेला विश्वास मार्कोनं लगेच सार्थ ठरवलाय.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
दक्षिण आफ्रिकेतील दरबानमध्ये सुरु असलेल्या टेस्टमध्ये मार्कोच्या वादळापुढे श्रीलंकन क्रिकेट टीमची वाताहात झाली. या टेस्टमध्ये श्रीलंकेची पहिली इनिंग फक्त 42 रनवरच संपुष्टात आली. मार्कोच्या भन्नाट स्पेलला श्रीलंकेच्या बॅटर्सना कोणतंही उत्तर नव्हतं. मार्कोनं 6.5 ओव्हर्समध्ये फक्त 13 रन्सच्या मोबदल्यात 7 विकेट्स घेतल्या.
( नक्की वाचा : IPL 2025 : KKR चा नवा कॅप्टन कोण? श्रेयसनंतर पुन्हा मुंबईकरच करणार नेतृत्त्व? )
श्रीलंकेचा टेस्ट क्रिकेटच्या इतिहासातील हा सर्वात कमी स्कोअर आहे. यापूर्वी 1994 साली पाकिस्तानविरुद्ध झालेल्या कँडी टेस्टमध्ये श्रीलंकेची इनिंग 71 रनवर संपुष्टात आली होती. टेस्ट क्रिकेटच्या आजवरच्या इतिहासात श्रीलंकन टीम पहिल्यांदाच 50 पेक्षा कमी रन्समध्ये ऑल आऊट झाली आहे.
दरबन टेस्टमध्ये दक्षिण आफ्रिकेची पहिली इनिंग 191 रनवर संपुष्टात आली होती. आफ्रिकेची इनिंग लवकर गुंडळण्यात यश आल्यानं श्रीलंकेला मोठी आघाडी घेण्याची संधी होती. पण, यान्सनच्या स्पेलमुळे ते शक्य झालं नाही. पहिल्या इनिंगमध्ये श्रीलंकेचे फक्त दोन बॅटर्स दोन अंकी रन करु शकले. यान्सनच्या या स्पेलच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेनं पहिल्या इनिंगमध्ये 149 रन्सची भक्कम आघाडी घेतली.
यापूर्वी दक्षिण आफ्रिकेकडून पहिल्या इनिंगमध्ये कॅप्टन टेंबा बवुमानं एकाकी झुंज देत 70 रन्सची खेळी केली. पहिल्या दोन्ही इनिंगमध्ये कोणत्याही बॅटरनं झळकावलेली ही एकमेव हाफ सेंच्युरी आहे.