वानखेडे स्टेडियमला 50 वर्षे पुर्ण झाली आहे. या पार्श्वभूमीवर वानखेडे स्टेडीयमचा सुवर्ण महोत्सव साजरा केला जात आहे. त्यासाठी एका भव्य कार्यक्रमाचे वानखेडे स्टेडियमवर आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी दिग्गज खेळाडू उपस्थित होते. या कार्यक्रमात सचिन तेंडुलकरने जोरदार फटकेबाजी करत अनेक राज खोलले. शिवाय वानखेडेवरच आपल्या कारकीर्दीतील शेवटचा सामना का खेळायचा होता हे त्यानं सांगितलं. वानखेडेवर झालेला पहिला प्रवेश ते ड्रेसिंग रुममध्ये झालेल्या गंमती जमती सचिननं यावेळी सर्वांबरोबर शेअर केल्या.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा)
मराठीत बोलताना सचिन म्हणाला मी तुम्हा सर्वांना प्रथम नमस्कार करतो. ज्यावेळी मी निवृत्त झालो त्यावेळी माझ्या हातात पाण्याची बाटली होती. आज ही तशीच पाण्याची बाटली हातात आहे. त्या मागे काही तरी इमोशन असल्याचं सचिन यावेळी म्हणाला. त्यावेळी दिलेले प्रेम तेच प्रेम आजही तुम्ही देता आहात त्याबद्दल सचिनने सर्वांचे आभार मानले. वानखेडे स्टेडीयमला पन्नास वर्षे पुर्ण झाली आहेत. या स्टेडीयमने क्रिकेट प्रेमींना मोठा आनंद दिला आहे. त्यामागे मोठी टीम आहे जी 1974 पासून काम करत आहे असंही तो म्हणाला. त्यांच्या समर्थनामुळे आम्हाला शक्ती मिळाली असंही त्यानं सांगितलं.
वानखेडे स्टेडीयम बरोबर आपलं नातं काहीसं वेगळं आहे. मुंबई क्रिकेटमुळे मी वानखेडेवर आलो. यावेळी वानखेडीची पहिला आठवण सचिनने आवर्जून सांगितली. ज्यावेळी मी दहा साडेदहा वर्षाचा होतो त्यावेळी पहिल्यांदा वानखेडे स्टेडीयममध्ये आलो होतो. त्यावेळी भारत आणि वेस्टईडीज यांच्यात सामना होता. त्यावेळी नॉर्थ स्टँडवर बसून मॅच बघितली होती. वांद्र्यातून आम्ही 25 मित्र एकत्र आलो होतो. पण आमच्याकडे 25 तिकीटं होती. मी लहान होतो. मला उंची कमी असल्यामुळे तसचं आतमध्ये घुसवलं होतं. त्यावेळी आपण पहिल्यांदा हिरवंगार ग्राऊंड पाहीलं होतं. आम्ही मातीत खेळायचो. त्यामुळे असं ग्राऊंड पहिल्यांदा पाहीले. त्याच वेळी ठरवलं होतं की एक दिवस इथं खेळायचं. हीच माझी वानखेडेची सुरुवात होती असं ही सचिनने सांगितले. त्यानंतर एकामागून एक न विसरणारे क्षण वानखेडेवर आले असंही त्याने सांगितलं. रणजी ट्रॉफी खेळताना इथं खुप मजा केली. मेहनत केली. चांगले सामने झाले ते जिंकले. गेली पन्नास वर्ष वानखेडेवर आपण एन्जॉय केला आहे पुढची अनेक वर्ष आपण हे स्टेडीयम एन्जॉय करूयात असंही तो म्हणाला.
वानखेडेवर आपली शेवटची मॅच व्हावी असं आपल्याला वाटत होतं. याचं कारण ही यावेळी सचिनने यावेळी आवर्जून सांगितलं. शेवटची मॅच कधी ही न विसरणारी आहे. त्यानंतर मी निवृत्त झालो. आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायला लागल्या पासून माझ्या आईने मला कधीही स्टेडीयममध्ये येवून खेळताना पाहिलं नव्हतं. आईला मला खेळताना पाहायचं होतं. आईनंही मी गेली 25 वर्षे बाहेर जावून काय करत होतो हे वानखेडेमध्ये बसून पहावे अशी आपली इच्छा होती. ती मी बीबीसीआयकडे बोलून दाखवली होती. त्यानंतर शेवटची मॅच मुंबईत वानखेडेवर झाली. त्यावेळी आई माझी मॅच पाहाण्यासाठी आली होती. आईला त्यावेळी मोठ्या स्क्रीनवर पाहीलं. आईला आपण मोठ्या स्क्रीनवर दिसतोय हे माहित नव्हतं. आईला पाहून डोळ्यात आश्रू आले. तो क्षण आपल्यासाठी महत्वाचा होता. ते कधीही विसरता येणार नाही. त्याचा साक्षिदार वानखेडे स्टेडीयम असल्याचं सचिनने यावेळी सांगितलं.
1988 साली मुंबईकडून पदार्पणाचा सामना सचिन खेळला होता. हा सामनाही वानखेडे स्टेडीयमवरच खेळलो होतो असं सचिन म्हणाला. त्यावेळी मुंबईच्या संघात भारतासाठी खेळलेले सात खेळाडू होते. त्यामुळे आम्हाला कसलीही भिती नव्हती. भिती उलट समोरच्या संघाला वाटायची असं सचिनने आवर्जून सांगितलं. शिवाय आपल्या वडापाव प्रेमाबद्दलही सचिन बोलला. वडापावचा वानखेडेतील किस्साही त्याने यावेळी सांगितला. वडापावची इतकी आवड होती की एका खेळाडूच्या टिफीन मधील वडापाव आपण कसा चोरून खालला होता हे सचिनने सांगितलं. पण तो नक्की कुणी चोरला होता हे एक राज आहे. ते ड्रेसिंगरूमच्या बाहेर कधीच आले नाही असंही त्याने स्पष्ट केले.