Arjun Tendulkar Engangement : भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याने एका खासगी सोहळ्यात सानिया चंडोकसोबत साखरपुडा केल्याची बातमी समोर आली आहे. NDTV ला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा साखरपुड्याचा सोहळा बुधवारी पार पडला. या बातमीची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली आहे. मात्र, तेंडुलकर आणि चंडोक कुटुंबीयांनी अद्याप यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
कोण आहे सानिया चंडोक?
इंडिया टुडेच्या एका रिपोर्टनुसार, सानिया चंडोक या मुंबईतील प्रसिद्ध उद्योजक रवी घई यांची नात आहे. घई कुटुंब हॉस्पिटॅलिटी आणि फूड इंडस्ट्रीजमध्ये त्यांच्या योगदानासाठी प्रसिद्ध आहे. ते इंटरकॉन्टिनेंटल हॉटेल आणि ब्रुकलिन क्रीमेरीचे मालक आहेत. रिपोर्टमध्ये असेही म्हटले आहे की, अर्जुन आणि सानिया यांचा साखरपुडा साध्या पद्धतीने आणि खासगी करण्यात आला. त्यामुळे या सोहळ्याला दोन्ही बाजूंचे फक्त जवळचे मित्र आणि कुटुंबीय उपस्थित होते.
अर्जुन तेंडुलकरची क्रिकेट कारकीर्द
अर्जुन तेंडुलकर एक डावखुरा वेगवान गोलंदाज आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो गोव्यासाठी खेळतो. आतापर्यंतच्या 17 फर्स्ट-क्लास सामन्यांमध्ये त्याने 37 विकेट्स घेतल्या असून, 532 धावा केल्या आहेत.
टी-20 मध्ये त्याने 24 सामने खेळले असून, 27 विकेट्स घेतल्या आहेत आणि 119 धावा केल्या आहेत. तसेच, त्याने 18 वन-डे सामन्यांमध्ये 25 विकेट्स घेतल्या असून, 102 धावा केल्या आहेत.
आयपीएलमध्ये त्याने मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने 2023 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले आणि 4 सामन्यांमध्ये 3 विकेट्स घेतल्या. 2024 च्या हंगामात त्याला फक्त 1 सामन्यात खेळण्याची संधी मिळाली आणि तो एकही विकेट घेऊ शकला नाही. 2024 च्या मेगा लिलावात मुंबई इंडियन्सने त्याला 30 लाख रुपयांना पुन्हा खरेदी केले होते.