चॅम्पियन्स ट्रॉफीतील (Champions Trophy 2025) खराब कामगिरीमुळे पाकिस्तान क्रिकेट टीमवर (Pakistan Cricket Team) त्यांचे फॅन्स नाराज आहेत. नुकत्याच झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचा पाकिस्तान हा यजमान देश होता. पण, पहिले दोन सामने गमावल्यानंतर पाकिस्तानचं स्पर्धेतील आव्हान सेमी फायनलपूर्वीच समाप्त आलं. मैदानातील खराब कामगिरीमुळे पाकिस्तान टीमवर टीका होत आहे. त्याचवेळी पाकिस्तानचा माजी कॅप्टन आणि लोकप्रिय खेळाडू शाहिद आफ्रिदीवर (Shahid Afridi) त्याच्याच टीममधील माजी सहकाऱ्यानं गंभीर आरोप केला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पाकिस्तानी वंशाचा हिंदू क्रिकेट दानिश कनेरियानं (Danish Kaneria) शाहिद आफ्रिदीवर आरोप केले आहेत. कनेरियानं सांगितलं की, मला अनेकदा आफ्रिदीनं धर्मांतर करण्यास सांगितलं होतं. वॉशिंग्टन डीसीमध्ये काँग्रेसच्या एका ब्रीफिंगमध्ये पाकिस्तानमधील अल्पसंख्याकांची दुरावस्था या विषयावर माजी लेग स्पिनरनं उघडपणे त्याचा अनुभव मांडला.
कानेरियानं 2000 ते 2010 या कालावधीमध्ये 61 टेस्टमध्ये पाकिस्तानचं प्रतिनिधित्व केलं. तो राष्ट्रीय टीमकडून खेळणारा अनिल दलपतनंतरचा दुसरा हिंदू क्रिकेटपटू होता. देशात सन्मान मिळाला नाही त्यामुळेच अमेरिकेत जाण्याचा निर्णय घेतला, असं त्यानं सांगितलं.
मी खूप भेदभाव सहन केला. माझं करिअर नष्ट झालं. मला पाकिस्तानमध्ये पाठिंबा आणि सन्मान मिळाला नाही. याच भेदभावामुळे मी आज अमेरिकेत आहे. इथं माझं मत मांडत आहे. आम्ही काय भोगलंय हे अमेरिकेला माहिती हवं. त्यानंतरच त्यांना काही कृती करता येईल, असं दानेरियानं सांगितलं.
( नक्की वाचा : 'भारतीय क्रिकेटपटूचे वडील घेत होते धर्मांतराचे कार्यक्रम', क्लबनं केली खेळाडूवर कारवाई )
आफ्रिदीनं टाकला होता दबाव
दानिश कनेरियानं शाहिद आफ्रिदीवर हा आरोप पहिल्यांदा केलेला नाही. त्यानं 2023 साली एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्येही हा आरोप केला होता. शाहिद आफ्रिदीनं अनेकदा मला इस्लामचा स्वीकार करण्यास सांगितलं होत. त्यावेळी इंजमाम उल हक हा एकमेव कॅप्टन होता, ज्यानं मला पाठिंबा दिला, असं कानेरियानं सांगितलं होतं.
माझं करिअर व्यवस्थित सुरु होतं. काऊंटी क्रिकेट देखील खेळत होतो. इंजमाम उल हकनं मला चांगला पाठिंबा दिला. माझी साथ देणारा तो एकमेव कॅप्टन होता. त्याशिवाय शोएब अख्तरनं मला साथ दिली. शाहिद आफ्रिदी आणि अन्य पाकिस्तान क्रिकेटपटूनं धर्म परिवर्तनं करण्यास सांगितलं होतं. त्यांनी मला खूप त्रास दिला. अनेक पाकिस्तानी खेळाडू माझ्यासोबत जेवण करत नसत, असा अनुभव कानेरियानं सांगितला.
दानिश कनेरियाला इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डानं (ECB) स्पॉट फिक्सिंगमध्ये दोषी ठरवलं होतं. त्यानंतर 2012 साली त्याच्यावर आजीवन बंदी घालण्यात आली. त्यापूर्वी त्यानं 61 टेस्टमध्ये पाकिस्तानचं प्रतिनिधित्व केलं. त्यामध्ये 3.07 च्या इकोनॉमी रेटनं 261 विकेट्स घेतल्या.