Bengaluru stampede : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) नं मिळवलेल्या आयपीएल विजेतेपदाला गालबोट लागलं आहे. या ऐतिहासिक विजेतेपदाबद्दल बंगळुरुमध्ये विजयी परेड काढण्यात येणार होती. या कार्यक्रमाच्या पूर्वी बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवच्या बाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर या चेंगराचेंगरीत 50 जण जखमी झाल्याचा अंदाज आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
आरसीबी (रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु) ची टीम त्यांच्या विजयाचा जल्लोष करत होती. या आनंद सोहळ्यात हजारो चाहते उपस्थित होते. आरसीबीचं हे पहिलंच आयपीएल विजेतेपद आहे. त्यामुळे फॅन्स प्रचंड उत्साहात होते. पण, या उत्साहाला गालबोट लागलं आहे.
कर्नाटक राज्य क्रिकेट संघाने आयपीएल 2025 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयानंतर त्यांच्या सन्मानार्थ एका समारंभाचे आयोजन केले होते, ज्यात हजारो रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुचे चाहते मोठ्या संख्येने पोहोचले होते.
एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगलुरुबाहेर जमा झालेल्या गर्दीला नियंत्रित करण्यासाठी कर्नाटक पोलिसांनी लाठीचार्जही केला.
हजारो लोकांच्या उपस्थितीमुळे गर्दी अचानक अनियंत्रित झाली आणि त्यामुळे चेंगराचेंगरी झाली, अशी माहिती आहे. घटनास्थळी परिस्थिती खूपच गंभीर बनली होती. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे.
घटनास्थळी उपस्थित लोकांनी केली एकमेकांना मदत
या चेंगराचेंगरीमुळे स्टेडियमबाहेर आरसीबीचे (RCB) अनेक चाहते अशक्त होऊन पडले. सर्व जखमींना रुग्णालयात पोहोचवण्यासाठी घटनास्थळी अनेक रुग्णवाहिका (ambulances) पाठवण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर, घटनास्थळी उपस्थित लोकांनीही एकमेकांना मदत केली. काही लोक जखमींना सीपीआर (CPR) देतानाही दिसले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world