T-20 World Cup : भारत विरूद्ध पाकिस्तान (India Vs Pakistan Match T20 World Cup) क्रिकेट सामना असला की त्याकडे सगळ्या क्रिकेट विश्वाचे लक्ष लागलेले असते. हा सामना अत्यंत चुरशीचा होणार याची क्रिकेट रसिकांना खात्री असते. त्यामुळे वाटेल ते झालं तरी हा सामना चुकवायचा नाही, असा प्रत्येक क्रिकेटप्रेमीचा प्रयत्न असतो. मग तो क्रिकेटप्रेमी भारतातला असो अथवा पाकिस्तानातील हा सामना अजिबात चुकवत नाही. काही क्रिकेट चाहते असे असतात, जे हा सामना प्रत्यक्ष मैदानात जाऊन पाहण्यासाठी काहीही करायला तयार असतात. रविवारी (9 जून 2024) झालेल्या सामन्याच्या वेळीही असेच चित्र पाहायला मिळाले. T20 World Cup स्पर्धेतील 19वा सामना रविवारी म्हणजेच 9 जूनला झाला. अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील नासाऊ काऊंटी आंतरराष्ट्रीय मैदानात हा सामना खेळवण्यात आला होता.
हा सामना पाहण्यासाठी जगभरातून क्रिकेटप्रेमी आले होते. यामध्ये पाकिस्तानातून आलेल्या एका क्रिकेट रसिकाचाही समावेश होता. हा सामना पाहता यावा, तिकीट खरेदी करता यावे आणि अमेरिकेपर्यंत पोहोचता यावे, यासाठी या क्रिकेट रसिकाने आपला ट्रॅक्टर विकून टाकला होता. ट्रॅक्टर विकून हा पाकिस्तानी संघाचा चाहता अमेरिकेला आला खरा मात्र पाकिस्तानी संघाने त्याची साफ निराशा केली.
(नक्की वाचा: T-20 World Cup : भारतीय गोलंदाज चमकले, 6 रन्सने पाकिस्तानवर सनसनाटी मात)
लाखो रुपयांचे तिकीट
भारताविरूद्धचा पाकिस्तानी संघाचा सामना पाहण्यासाठी आलेल्या एका क्रिकेट रसिकाशी एएनआयने बातचीत केली. सामना पाहण्यासाठी ट्रॅक्टर विकल्याचे त्याने सांगितले. या सामन्यासाठीचं तिकीट अडीज लाख रुपये इतकं होतं. ते खरेदी करता यावं यासाठी त्याने पैसे जमा केले आणि सामना पाहण्यासाठी पोहोचला. सामन्यानंतर बोलताना या चाहत्याच्या चेहऱ्यावरील निराशा स्पष्टपणे दिसत होती. त्याला भारतीय क्रिकेटप्रेमींनी घेरलं होतं. त्याने सांगितलं की सामन्याच्या तिकीटासाठी त्याने त्याचा ट्रॅक्टरही विकला. 'पाकिस्तानी संघासमोर किरकोळ लक्ष ठेवण्यात आलं होतं. मात्र सगळे फलंदाज बावळटासारखे खेळले, काय बोलणार आता?' अशी प्रतिक्रिया या चाहत्याने दिली.
(नक्की वाचा: भारतीय खेळाडुंच्या जोरावर छोट्या संघांची दमदार कामगिरी, 4 मोठे उलटफेर)
भारताने सामना जिंकला, पंत; बुमराहची कमाल
आयसीसी विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात भारतीय संघाने पाकिस्तानवरच्या वर्चस्वाचा आपला सिलसिला कायम राखत रविवारचाही सामना जिंकला. 2021 साली भारत आणि पाकिस्तान यांच्यात दुबईमध्ये टी-20 वर्ल्डकपचा सामना खेळवण्यात आला होता. त्या सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला होता. हा अपवाद वगळला तर पाकिस्तानला आयसीसीच्या प्रत्येक स्पर्धेत भारतापुढे नेहमी नांगी टाकावी लागली आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या सामन्यात पाकिस्तानने टॉस जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.
(नक्की वाचा: पाकिस्तानच्या पराभवाचा टीम इंडियाला धडा, रोहित शर्माला महाग पडतील 4 चुका)
ऋषभ पंत वगळता एकही भारतीय फलंदाज चमकदार कामगिरी करू शकला नाही. पंतने 42 धावा केल्या. 20 धावा करणाऱ्या अक्षर पटेलने पंतला चांगली साथ देण्याचा प्रयत्न केला. भारतीय संघ सगळी 20 षटकेही खेळू शकला नाही आणि 119 धावांवर बाद झाला. यानंतर पाकिस्तानी संघ फलंदाजीसाठी उतरला आणि त्यांनी खेळपट्टीवर टिकून राहात वेगाने धाव करण्याचे प्रयत्न सुरू केले. बुमराच्या गोलंदाजीवर मिळालेल्या जीवदानाचा फायदा घेत भारतीय बाबर आझमने रिझवानच्या जोडीने संघाला पहिल्या विकेटसाठी 26 धावांची भागीदारी करुन दिली.
ही जोडी भारतासाठी डोकेदुखी ठरणार असं वाटत असतानाच बुमराहने बाबर आझमला बाद केलं. उस्मान खान आणि मोहम्मद रिझवान यांनी दुसऱ्या विकेटसाठी 31 धावांची भागीदारी केली. रिझवान हा भारताच्या तोंडून घास हिरावणार, असं वाटत होतं. त्याला 31 धावांवर बुमराहने बाद केलं. बुमराहने मोक्याच्या क्षणी तीन महत्त्वाच्या विकेट घेत पाकिस्तानला सावरू दिलं नाही. हार्दिक पांड्याने 2 तर अर्शदीप सिंह आणि अक्षर पटेलने प्रत्येकी 1 विकेट घेत पाकिस्तान पराभूत होईल याची नीट काळजी घेतली.