Rinku Singh Engagement : जगभरातील बॉलर्सची धुलाई करणारा टीम इंडियाचा बॅटर रिंकू सिंहची विकेट पडल्याची चर्चा आहे. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात होणाऱ्या T20 सीरिजसाठी रिंकूची भारतीय टीममध्ये निवड झाली आहे. तो T20 टीममधील महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याचबरोबर कोलकाता नाईट रायडर्सनं (Kolkata Knight Riders) देखील त्याला आगामी सिझनसाठी रिटेन केलं आहे. रिंकूची विकेट क्रिकेटच्या मैदानात नाही तर वैयक्तिक आयुष्यात पडल्याचा दावा सोशल मीडिया पोस्टमधून करण्यात येत आहे. समाजवादी पक्षाच्या खासदारासोबत रिंकूचा साखरपुडा झाल्याचं वृत्त आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
उत्तर प्रदेशातील मछलीशहर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रिया सरोज ( Samajwadi Party's Member of Parliament (MP) Priya Saroj) यांच्याबरोबर रिंकूचा साखरपुडा झाल्याचं वृत्त आहे. 25 वर्षांच्या प्रिया सरोज या लोकसभेतील सर्वात तरुण खासदार आहेत.
सरोज यांनी कायद्याचं शिक्षण घेतलं असून त्यांची राजकीय पार्श्वभूमी आहे. त्या तीन वेळा खासदार आणि सध्या आमदार असलेल्या तुफानी सरोज यांच्या कन्या आहेत. 2024 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी ज्येष्ठ भाजपा नेत्याचा पराभव केला होता.
न्यूज 24 नं दिलेल्या वृत्तानुसार रिंकू आणि प्रिया यांचा साखरपुडा झाला असून त्यांचं लवकरच लग्न होणार आहे. त्याचबरोबर अनेक पत्रकार तसंच सोशल मीडिया युझर्सनी या दोघांच्या साखरपुड्याची पोस्ट शेअर केली आहे.
आयपीएलमध्ये मिळाला मोठा भाव
रिंकू सिंहला 2025 च्या मेगा ऑक्शनपूर्वी कोलकाता नाईट रायडर्सनं 13 कोटी रुपयांना रिटेन केले आहे. त्याला यापूर्वी 55 लाख रुपये वेतन होते. 55 लाख ते 13 कोटी हा प्रवास रिंकूनं मोठ्या कष्टानं पूर्ण केला आहे.