Vaibhav Sooryavanshi: भारतीय क्रिकेटमध्ये सध्या वैभव सू्र्यवंशी या 15 वर्षांच्या 'बेबी बॉस'ची जोरदार चर्चा सुरू आहे. नुकतीच आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या आगामी T20 दौऱ्यासाठी भारतीय संघात त्याची निवड झालीय. वैभवच्या या गगनभरारीनंतर आता भारतीय क्रिकेटच्या गोटातून काही धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. वैभवचा ज्या वेगाने भारतीय संघात प्रवेश झाला आहे, त्यामुळे देशातील काही वरिष्ठ क्रिकेटपटू फारसे खूश नसल्याचा खळबळजनक दावा केला जात आहे.
वरिष्ठ खेळाडूंमध्ये नाराजीची लाट?
एकीकडे भारताचा मुख्य संघ अफगाणिस्तानविरुद्धच्या ODI मालिकेत व्यस्त असताना, दुसरीकडे क्रिकेट जगताचे लक्ष वैभव सूर्यवंशी याच्याशी जोडल्या गेलेल्या वादाकडे वेधले गेले आहे. क्रिकेट अॅडिक्टरच्या एका रिपोर्टनुसार,भारतीय संघातील काही खेळाडूंना वैभवचा हा अचानक झालेला उदय फारसा पचलेला नाही.
या रिपोर्टमध्ये BCCI च्या एका सूत्राचा हवाला देत सांगण्यात आले , भारतीय ड्रेसिंग रूममधील काही खेळाडू वैभवला इतक्या कमी वयात मिळत असलेल्या प्रसिद्धीमुळे आणि संधीमुळे नाराज आहेत. काही वरिष्ठ खेळाडूंनी तर निवड समिती आणि अधिकार्यांना असा सल्ला दिला आहे की, या तरुण खेळाडूला इतक्या घाईघाईने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मुख्य प्रवाहात आणू नये. मात्र, या चर्चांवर अजूनही BCCI किंवा कोणत्याही खेळाडूकडून अधिकृत शिक्कामोर्तब झालेले नाही.
वैभवचं इतकं कौतुक का?
वैभव सूर्यवंशीचं इतकं कौतुक का केलं जात आहे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याचे उत्तर त्याच्या IPL 2026 मधील कामगिरीत दडलेले आहे. राजस्थान रॉयल्सकडून खेळताना या तरुण बॅटरने यंदा स्वप्नवत कामगिरी केली. त्याने 16 सामन्यांमध्ये तब्बल 776 रन ठोकले आणि या सीझनमध्ये ऑरेंज कॅपवर आपले नाव कोरले.
यंदाच्या आयपीएल सिझनमध्ये त्याचा स्ट्राईक रेट 237.30 आणि सरासरी 48.50 इतकी अचंबित करणारी होती. त्याच्या याच निर्भीड बॅटिंगमुळे सध्या त्याला भारतीय क्रिकेटचा पुढचा सुपरस्टार मानले जात आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा आपल्या करिअरच्या अंतिम टप्प्यात असताना, भारताला वैभवच्या रूपाने एक नवा हुकमी एक्का मिळाला आहे.