IPL 2025 : आयपीएल 2025 च्या 62 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्जचा 6 विकेट्सने पराभव केला. या सामन्यात राजस्थानच्या 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीने पुन्हा एकदा चमकदार कामगिरी केली. वैभवने 57 धावांची खेळी केली. आपल्या तुफानी खेळीव्यतिरिक्त एका कृतीमुळे वैभव सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
सामना संपल्यानंतर, जेव्हा खेळाडू एकमेकांशी हस्तांदोलन करत होते, तेव्हा वैभवने धोनीच्या पायांना स्पर्श केला. धोनी देखील वैभवच्या कृतीने आनंदी झाला आणि त्याने त्याच्या पाठीवर थाप मारून त्याचे कौतुक केले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. वैभववर चहूबाजूने कौतुकाचा वर्षाव होत आहे.
सर्वात वयस्कर आणि सर्वात तरुण खेळाडू
धोनी आणि वैभव यांच्या बाबतीत एक योगायोग दिसून आला. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले जेव्हा सर्वात वयस्कर आणि सर्वात तरुण खेळाडू एकत्र मैदानात उतरले. धोनी 43 वर्षांचा असताना आयपीएल 2025 मध्ये खेळत होता , तर वैभव फक्त 14 वर्षांचा आहे.
सामन्यात काय झालं?
सामन्यात सीएसकेने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 8 गडी गमावून 187 धावा केल्या. त्यानंतर राजस्थान रॉयल्स संघाने 17.1 षटकांत 4 गडी गमावून लक्ष्य गाठले. वैभव सूर्यवंशीने 33 चेंडूत 57 धावांची खेळी केली. यात 4 चौकार आणि 4 षटकारांचा साज होता. तर यशस्वी जयस्वालने 36 धावांची खेळी खेळली. याशिवाय संजू सॅमसन 41 धावा करून बाद झाला. राजस्थान रॉयल्सकडून तीन विकेट घेणाऱ्या आकाश माधवालला त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीसाठी सामनावीराचा किताब देण्यात आला.